इस्माईल युसुफ महाविद्यालयात लवकरच मुलींचे वसतीगृह

नेत्वा धुरी
गुरुवार, 18 मे 2017

- उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय
- मुलींच्या वसतीगृहासाठी रुपये ३२ कोटी ६४ लाखांची प्रशासकीय मान्यता
- तर अन्य कामांसाठी रुपये ८ कोटी मंजुर.
- महाविद्यालयास नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त

मुंबई: राज्य शासनाचे जोगेश्‍वरी पुर्व येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयात लवकरच मुलींचे वसतीगृह, वाणिज्य शाखेसाठी स्वतंत्र इमारत तसेच वाचनालय उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.  गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली इस्माईल युसुफ महाविद्यालयात पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या महाविद्यालयास नुकताच नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या आमदार निधी तसेच जिल्हा नियोजन निधीतून या महाविद्यालयाच्या विकासाची सुमारे ३४ कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी तब्बल रुपये १० कोटी खर्च करण्यात येत आहे. यात सभा मंडप, मुलांच्या हॉस्टेलच्या दुरुस्तीचे काम, खाणावळ, लाईटची व्यवस्था, मुलींची कॉमन खोली, जॉगिंग ट्रॅक, फॅन्सींग, स्पोटर्‌‌स ग्राऊंड आदी कामांचा समावेश आहे. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज इस्माईल युसुफ महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या परदेशी, कॉलेजच्या प्राचार्य डॉ.स्वाती व्हावळ आदी अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेऊन मुलांच्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचे काम सध्याच्या सुट्टीच्या कालावधीत त्वरित पुर्ण करावे, अशा सुचनाही वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात मुलींचे वसतीगृहच नसल्याने लवकर या महाविद्यालयात ३२० मुलींच्या राहण्याची क्षमता असणारे मुलींचे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे रुपये ३२ कोटी ६४ लाख २८ हजार ९०० रुपये इतका निधीही मंजुर करण्यात आला आहे. त्याचबरोबर २०१७ -१८ या आर्थिक वर्षात इस्माईलय युसुफ महाविद्यालयाच्या विकासासाठी सुमारे ८ कोटी ९१ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. यात वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याने महाविद्यालयात वाणिज्य शाखेची  ५ मजल्याची स्वंतत्र इमारत तसेच वाचनालय उभारण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती व्हावळ यांनी राज्यमंत्री वायकर यांना दिली. या दोन्ही इमारतीचे आराखडे तात्काळ तयार करण्याचे आदेश राज्यमंत्री वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

Web Title: Girls Hostel soon in Ismail Yusuf College