अस्मितेच्या गप्पा नकोत फिल्मसिटीला चांगल्या सोयी द्या, आशिष शेलारांचा टोला

कृष्ण जोशी
Thursday, 3 December 2020

फक्त अस्मितेच्या गप्पांचा बोलघेवडेपणा करून राज्याचे नुकसान करू नका. बिझनेस फ्रेंडली वातावरण ही आजची गरज आहे, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे.

मुंबई: उत्तर प्रदेश सरकार त्यांच्या फिल्मसिटीला ज्या दर्जाच्या सवलती देणार आहेत, त्यापेक्षा चांगल्या सुविधा येथे द्या. फक्त अस्मितेच्या गप्पांचा बोलघेवडेपणा करून राज्याचे नुकसान करू नका. बिझनेस फ्रेंडली वातावरण ही आजची गरज आहे, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे.

उत्तर प्रदेश सरकारची फिल्मसिटी म्हणजे बॉलिवूड पळवून नेण्याचा डाव आहे, अशा आशयाच्या सेना नेत्यांच्या टीकेला शेलार यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. राज्याची अस्मिता हे प्रत्येक मुद्द्याला उत्तर नसते. अस्मितेचे भाषण देणे ही आजही गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र करावे, असा प्रस्ताव केंद्रातील काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला पाठवला होता. मात्र बीकेसी मधील जागा महाग असून अन्यत्र जागा संपादित न केल्याचे कारण तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी दिल्याने तो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. अजूनही नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन हे प्रकल्प होणार का यासंदर्भात उलटसुलट वक्तव्ये राज्यातील सत्ताधारी करीत आहेत. म्हणजेच यांना परकीय गुंतवणूक नको आहे, फक्त कंत्राटदारी हवी आहे, असेही शेलार यांनी सकाळशी बोलताना दाखवून दिले. 

अधिक वाचा- Viral Video: भरधाव कारच्या खिडकीवर लटकत मद्यपान करणाऱ्या तिघांना अटक

उत्तर प्रदेश सरकार फिल्मसिटीसाठी सबसिडी देणार असेल, सोयी देणार असेल तर त्याहीपेक्षा चांगल्या सोयी महाराष्ट्रात द्याव्यात. त्यासाठी कामाला लागावे, फक्त बोलघेवडेपणा करून राज्याचे नुकसान करू नका. जेथे वीज स्वस्त आहे, जमीन उपलब्ध आहे, तेथे उद्योगधंदे जाणार हे उघड आहे. जेथे कामगार संघटनांची अरेरावी नसेल, अस्मितेच्या नावाखाली बाहेरच्या कलाकारांची अडवणूक नसेल, रस्ते आणि अन्य पायाभूत सोयी असतील अशा ठिकाणांनाच चित्रपट जगत प्राधान्य देणार. आर्थिक-व्यावसायिक जगताचा हा नियमच आहे, असेही शेलार यांनी सांगितले. 

रामोजी फिल्मसिटीचे काय

रामोजी फिल्मसिटीने तर सर्वोत्तम सुविधा दिल्या. मात्र त्यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न कोणीही उपस्थित केला नव्हता. अजूनही राज्याचे नुकसान करायचे नसेल तर अस्मितेच्या नावाने गळे काढण्याऐवजी चांगल्या सोयी देण्याची, दुसऱ्या राज्याच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी करा. बेगडी अस्मितेच्या बोलघेवडेपणाची स्पर्धा करू नका, असाही टोला शेलार यांनी लगावला.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Give good facilities to Filmcity Bjp mla Ashish Shelar attack


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give good facilities to Filmcity Bjp mla Ashish Shelar attack