मतदान करा, मेंटेनन्समध्ये सूट मिळवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कांदिवलीतील धीरज एनक्लेव्ह या सोसायटीने मतदानात वाढ करण्याकरीता ही सूट जाहिर केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कांदिवलीतील धीरज एनक्लेव्ह या सोसायटीने देखील मतदानात वाढ करण्याकरीता मतदान करणाऱ्या सदस्याला मेंटेनन्स मध्ये 200 रुपयांची सूट देण्याबरोबरच दिवाळीसाठी मातीचे दिवे भेट म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ''सर्वांनी मतदान करा, फरक पडतो'' असे आवाहन ही सोसायटीकडून करण्यात आले आहे.

'आमदार मतदारसंघात फिरकला नाही, आमच्या समस्या सोडवल्या नाहीत' असे म्हणत अनेकजण लोकप्रतिनीधींच्या नावाने बोटे मोडतात तर काहीजण थेट मतदानावर बहिष्कार टाकतात, असे असले तरी अनेक सामान्य नागरिक मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करतात. असाच स्तुत्य उपक्रम कांदिवलीतील धीरज एनक्लेव्ह या सोसायटीने राबविला आहे. ज्यानुसार जो सदस्य मतदान करेल त्या सदस्याला मासिक मेंटेनन्समध्ये 200 रुपये सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही सूट वर्षभर मिळणार असून याशिवाय दिवाळीचे दिवे भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी सोसायटीने मतदान करण्यासाठी बाहेर पडा आणि दोनशे रुपये मेंटेनस मध्ये सूट मिळवा अशी पत्रकं देखील छापली आहेत. इतकेच नाही तर मतदानासाठीची ही आमंत्रण पत्रके सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच लहान मुलांनी घरोघरी जाऊन वाटली. या सोसायटीमध्ये 154 फ्लॅट असून समितीने सोसायटीतील सदस्यांना मतदान बुथपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील केली आहे. 

धीरज एनक्लेव्ह सोयायटीतर्फे प्रत्येक निवडणुकीला असा उपक्रम राबवला जात असून संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाला सोसायटीतील सदस्य दरवेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. दरम्यान यंदाही आमच्या सोसायटीमधून 100 टक्के मतदान होईल असा विश्वास अध्यक्ष रवी गायकवाड यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give Vote and get a discount on maintenance