गोदामाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

भिवंडी - भिवंडीतील वेदांता ग्लोबलच्या केमिकल गोदामास भीषण आग लागली. यामुळे प्रचंड प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. केमिकलचा साठा जळाल्याने येथील कामगारांना श्‍वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांना घटनास्थळावरून तत्काळ बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग अटोक्‍यात आणली. ठाणे पोलिस आयुक्‍त विवेक फणसाळकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्‍यातील ओवळी गाव परिसरात असलेल्या या केमिकल गोदामाला दुपारी ११ वाजण्याच्या सुमाराला अचानक भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

या गोदामात मोठ्या प्रमाणावर हैड्रोजन पॅरॉक्‍साइड, सोडियमसह अन्य प्रकारचे रासायनिक द्रव्य साठवण्यात आले आहे. ते जळाल्याने येथे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने ओवळी गाव व परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना श्‍वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. 

दबावामुळे कारवाईला विलंब
भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर, कोपर, दापोडा, अंजुरफाटा, कोनगाव, पूर्णा, कशेळी अशा विविध ग्रामपंचायत हद्दींमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. येथील शेकडो गोदामे ही अनधिकृतरीत्या बांधण्यात आली आहेत. त्यामुळे या गोदामांवर कारवाई करण्याचे आदेश वारंवार जिल्हाधिकारी व शासन स्तरावर दिले जातात; मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने गोदाम बांधकाम करण्याचे काम आजही जोमाने सुरू आहे.

विम्यासाठी आग?
या बेकायदा गोदामांत केमिकल, ऑईल व विविध मालांची साठवणूक होत असते. या गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगी विमा मिळवण्यासाठी लावल्या जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे. राज्य शासनाने येथे लागणाऱ्या आगींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Godown fire in bhiwadni