गोदामे ठरताहेत बेकायदा साठ्यांचे माहेरघर !

नीरज राऊत : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पालघर - पालघर जिल्ह्यातील दूरदूरवर वसलेली पडीक गोदामे, फार्म हाऊस, बंगले आदी वास्तू ही स्फोटके, ड्रग्स व इतर गैरधंद्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. यामुळे मुंबई, ठाण्यासह तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत आहे. वर्षभरात अशा प्रकारचे तीन-चार मोठ्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये स्थानिक पोलिसांचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जबाबदार ठरत आहे.

पालघर - पालघर जिल्ह्यातील दूरदूरवर वसलेली पडीक गोदामे, फार्म हाऊस, बंगले आदी वास्तू ही स्फोटके, ड्रग्स व इतर गैरधंद्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. यामुळे मुंबई, ठाण्यासह तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत आहे. वर्षभरात अशा प्रकारचे तीन-चार मोठ्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये स्थानिक पोलिसांचे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जबाबदार ठरत आहे.

मुंबई, ठाण्यालगत असलेल्या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात गवताची किंवा धान्य साठा आदींची अनेक गोदामे आहेत. या भागातील गवताचा व्यवसाय मंदीत गेल्याने; तसेच विविध कामांसाठी उभारण्यात आलेली गोदामे वापरली जात नसल्याने या ठिकाणी ड्रग्स, स्फोटके, याशिवाय खदणीमध्ये दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीन कांड्या, डिटोनेटरचा साठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. वाड्याजवळ काही महिन्यांपूर्वी स्फोटकांचा मोठा साठा सापडला. त्यापाठोपाठ मनोर येथील गवताच्या गोदामात रक्तचंदनाचा साठा सापडला होता; तर पालघरजवळ एका गावात ड्रग्स वितरणाचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पुढे आली होती.
या सर्व कारखान्यांमधील विशेष बाब म्हणजे, छापा टाकणारे पथक हे एटीएस किंवा बाहेरचे होते. अशा बेकायदा गैरव्यवहारांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य असते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात गोदामांसह अनेक बंगले, फार्म हाऊस उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी अवेळी गाड्या, ट्रक-टेम्पो येतात. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यास पोलिसांची मर्यादित संख्या कमी पडते. गावकरीही समाजातील अप्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे बेकायदा साठा करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले असल्याचे दिसून येते.

स्थानिक पोलिस व त्यांच्या गुप्तचर यंत्रणेची भूमिकाही असे प्रकार फोफावण्यास जबाबदार आहेत. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने पोलिस ठाण्यात पाऊल ठेवल्यास डोळ्याच्या भोवळ्या उंचावून त्याच्या अंगावर खेकसून विचारले जाते. त्यांनी एखादी महत्त्वाची किंवा संवेदनशील माहिती दिल्यास त्याकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. रिक्षाचालक, भंगारवाला, मद्यविक्रेता, जुगार-मटका-क्‍लब चालविणाऱ्यांना मिळणार आदरातिथ्य सर्वज्ञातच आहे. भंगारवाले व इतर गैरप्रकार करणाऱ्यांशी असलेले हितसंबंध जोडले असताना पोलिस अशा व्यक्तींना संरक्षण देण्याचे काम करते, असे सर्वसामान्यांना वाटत आहे.

पालघर झाले संवेदनशील
पालघरजवळ तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे केंद्र संवेदनशील मानले जाते. देशातील सर्व मोठ्या अशा तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक परप्रांतीय व तडिपार व्यक्तींचा वावर आहे. अशा सर्व समाजाला घातक असलेल्या प्रवृत्ती पालघर जिल्ह्यात एकत्रितपणे वास्तव्य करीत असल्याने हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा संवेदनशील होऊ पाहत आहे.

Web Title: Godown going to be illegal storage centre