देवदूत म्हणून आला; सोने लुटून गेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पनवेल - अपघातानंतर रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीने तरुणाकडील ९४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पलायन केले. तळोजा येथे नुकतीच ही घटना उघडकीस आली.

विक्रम सोलंकी (२१) असे या तरुणाचे नाव आहे. तो पनवेलमधील रिअल गोल्ड या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो.  शनिवारी तो सुमारे ३२०० ग्रॅम वजनाचे दागिने आणि चार लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग घेऊन मोटरसायकलने मुंब्रा-पनवेल मार्गे ‘रिअल गोल्ड’मध्ये जात होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तळोजा येथील पेंधर फाट्यानजीक पुढील वाहनाच्या चालकाने ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या विक्रमची मोटरसायकल त्यावर आदळली. या अपघातामुळे विक्रम जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर दोन व्यक्तींनी त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. विक्रमला नंतर पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आलेल्या विक्रमला कुणी तरी आपल्याजवळील दागिने तसेच पैसे असलेली बॅग घेऊन पलायन केल्याचे समजले.  या प्रकरणी  पोलिस तपास करत आहेत.

Web Title: gold loot crime