विमानतळावर लाखोंचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

दोन महिन्यांत 10 कोटींची कारवाई
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने मुंबईतील आंतराराष्ट्रीय विमानतळावर (एआययू) शनिवारी (ता. 25) सायंकाळी 57 लाख 62 हजारांचे सोने जप्त केले. शुक्रवारी (ता. 24) रात्री एक कोटी 77 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते. अटक संशयितांत तुर्कस्थानातील एक नागरिक आहे. दोन महिन्यांत "एआययू'ने 10 कोटींहून अधिक किमतीचे सोने जप्त केले.

दोन महिन्यांत 10 कोटींची कारवाई
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने मुंबईतील आंतराराष्ट्रीय विमानतळावर (एआययू) शनिवारी (ता. 25) सायंकाळी 57 लाख 62 हजारांचे सोने जप्त केले. शुक्रवारी (ता. 24) रात्री एक कोटी 77 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते. अटक संशयितांत तुर्कस्थानातील एक नागरिक आहे. दोन महिन्यांत "एआययू'ने 10 कोटींहून अधिक किमतीचे सोने जप्त केले.

मुंबई विमानतळावर सोने तस्करी वाढू लागली आहे. दुबईतील मोठे तस्कर छुप्या मार्गाने सोने "कॅरिअर'मार्फत मुंबईत आणत आहेत. अशा कॅरिअरवर एआययू लक्ष ठेवून असते. शुक्रवारी रात्री विमानतळावर एआययूचे उपायुक्त प्रज्ञाशील जुमले गस्तीवर होते. त्यांच्या पथकाने पाच तस्करांवर कारवाई केली. शनिवारी सायंकाळी केरळमधील जिब्रूमन कुनही दुबईहून मुंबईत आला होता. त्याच्याकडून 57 लाख 62 हजारांचे सोने एआययूने जप्त केले. त्याने लॅपटॉपच्या बॅगेत सोने लपवले होते. यापूर्वी कुनही याच्याकडून 12 फेब्रुवारीला त्याच्याकडून 984 ग्रॅम सोने आणि सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली होती. केरळमधील रहिवासी अब्दुल इरशाद चेलाथादाथील हा दुबईहून सहार विमानतळावर आला. त्याच्याकडून 35 लाख 82 हजारांचे सोने जप्त केले. अब्दुल केरळमधील मलापुराम गावात कामगार म्हणून काम करतो. त्याला दुबईतील सिद्धिकी नावाच्या कॅरिअरने (ने-आण करणारा तस्कर) सोने मुंबईत पोहचवल्यास 20 हजार रुपये कमिशन देतो, असे सांगितले होते, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

दुसऱ्या कारवाईत महंमद इलियास ऊमी मुगू याच्याकडून 17 लाख 91 हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तो दुबईहून मुंबई विमानतळावर आला होता. त्यालाही दुबईतीलच अय्युब नावाच्या व्यक्तीने सोने तस्करीकरता सांगितले होते, असे चौकशीत उघडकीस आले. सोने तस्करीसाठी परदेशी नागरिकांचा वापर वाढू लागला आहे. गोकन दामिर तुर्कस्थानहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्याकडून 92 लाख 64 हजारांचे; तर नयना गाशाडा या केनियातील महिलेकडू 12 लाख 10 हजारांचे सोने जप्त करण्यात आले.

नोटाबंदीमुळे तस्करीचा मार्ग
नोटाबंदीमुळे व्यवसाय थंडावल्यामुळे एका दलालाने तस्करीचा मार्ग अवलंबला. उल्हासनगरचा रहिवासी हरेश कुकरेजा दुबईला निघाला होता. त्याच्याकडून 18 लाख 47 हजारांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले. त्याने ते बुटामध्ये लवपवले होते. दुबईत आयफोन घेऊन ते मुंबईत विक्रीकरता आणण्याचा त्याचा विचार होता. एका आयफोनच्या मोबदल्यात त्याला तीन ते पाच हजारांचा नफा मिळणार होता, असे चौकशीत स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: gold seized on airport