दिनाभाई मोरे शिक्षण संस्थेला सुवर्णमहोत्‍सवाची झळाळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आगामी काळात संस्थेच्या शाळांमध्ये किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देण्याची सुरुवात करण्याचा ध्यास आपण सगळ्यांनी घ्यावा. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत नक्कीच करेन, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी केले. दिनाभाई मोरे शिक्षणसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कोलाड (बातमीदार) : आतापर्यंत पुस्तकी ज्ञान शाळांतून उत्तम पद्धतीने देण्यात आले. मात्र, आता आपल्या भागात येणारे विविध उद्योग लक्षात घेता विद्यार्थ्यांना किमान कौशल्याचे ज्ञान असणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामी काळात संस्थेच्या शाळांमध्ये किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देण्याची सुरुवात करण्याचा ध्यास आपण सगळ्यांनी घ्यावा. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत नक्कीच करेन, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी केले. दिनाभाई मोरे शिक्षणसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

साने गुरुजी विद्या निकेतन आनंदवन विद्यानगरी सानेगाव येथे शनिवारी (ता. ४) या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेच्या आवारात संस्थेचे संस्थापक स्व. दिनाभाई मोरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शाळेपर्यंत येणाऱ्या रस्त्याचे उद्‌घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

आंबा, काजूवर खराब हवामानचे शुक्‍लकाष्ठ

आपल्या ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षणात प्रगती करावी, या उद्देशाने ५० वर्षांपूर्वी दिनाभाईंनी या संस्थेची स्थापना केली. या कालखंडात भाईंचे नाव हे सतत सगळ्यांना प्रेरणादायी ठरत होते; मात्र आज शाळेच्या आवारात संस्थेने भाईंचे स्मरण सदैव राहावे, यासाठी बसवलेला हा पुतळाही नक्‍कीच प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्‌गार तटकरे यांनी काढले.

दिनाभाई मोरे यांनी १९६९ मध्ये सानेगाव येथे संस्थेची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर सुडकोली, चोरढे, आरे बुद्रुक, तिसे ग्रामीण बहुल दुर्गम भागात शाळांचा विस्तार झाला. अशा या संस्थेचा सुवर्णमहोत्सव सोहळा ४ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, देवी शारदा आणि सानेगुरुजी यांना वंदन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी करताना संस्थेच्या ५० वर्षांच्या वाटचालीला उजाळा दिला. सानेगाव शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे म्हात्रे यांनी तटकरे यांच्याकडे निधी मिळावा, अशी विनंती केली. त्याला तटकरे यांनी दुजोरा देत वर्षभरात संरक्षक भिंत बांधणार, असे आश्वासन दिले. 

या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला रोहा पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, ॲड. विवेक मोरे, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, मधुकर पाटील, विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, संस्था अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, भाई टक्के, गणेश मढवी, यशवंत शिंदे, हेमंत ठाकूर, जनार्दन ठाकूर, धर्मा भोईर, उमाजी गोरीवले, लक्ष्मण महाले, राजश्री पोकळे, सानेगाव सरपंच स्वप्नाली भोईर, वावे सरपंच राम गिजे आदी मान्यवरांसह नाभिक समाजबांधव, पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. विवेक मोरे यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार हेमंत ठाकूर यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Jubilee of Deenabhai More Education Trust