महामुंबईतील पोलिसांसाठी सुवर्णसंधी! सिडकोतर्फे घरांच्या नोंदणीला उद्यापासून प्रारंभ...

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

  • उद्यापासून पोलिसांच्या घरांच्या नोंदणीला प्रारंभ
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या औचित्याने ऑनलाईन सोहळा

नवी मुंबई : मुंबई महानगरातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी सिडकोतर्फे उभारण्यात येत असणाऱ्या घरांचा उद्यापासून (ता.27) शभारंभ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही नोंदणी प्रक्रीयेला प्रारंभ होणार आहे. सिडकोतर्फे तयार केल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. 

मुंबईतली मृत्यूसंख्या चिंताजनक, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

27 जुलैला ऑनलाईन सोहळ्यात अर्ज नोंदणीला सुरूवात होणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपूरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये एकूण 4466 सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शानदार विजय! 45 दिवसांच्या लढाईनंतर 80 वर्षीय आजोबा कोरोनामुक्त; नायर रुग्णालयात यशस्वी उपचार

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व अल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध आहेत.  फक्त मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्या राखीव आहेत. मासिक उत्पन्न 25 हजार रुपयांपर्यंत आणि मासिक उत्पन्न 50 हजार रुपयांपर्यंत अशा दोन गटांमध्ये या सदनिका आहेत. त्यांची किंमत किमान 19 लाख ते कमाल 31 लाख रुपये इतकी आहे. सोमवार, 27 जुलैपासून सुरू होणारी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया महिनाभर, म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे, तर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत चालणार आहे.

 

पोलिसांच्या घरांचा प्रश्न किती बिकट आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. नगरविकासमंत्री या नात्याने राज्यात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत असताना पोलिसांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. सेवा काळात सरकारी घरांमध्ये राहाणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल.
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

----------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden opportunity for Mumbai police! CIDCO starts registration of houses from today ...