गोल्फ कारची गेली हवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

वृद्ध प्रवाशांना दिलासा देणाऱ्या गोल्फ कारकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे...

मुंबई - वयोवृद्ध व अपंग प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील शेवटच्या फलाटापर्यंत पोहचवणारी गोल्फ कार बंद पडली आहे. पाच महिन्यांपासून या कारचे टायर पंक्‍चर व बॅटरी डिसचार्ज झाली आहे. याबाबत प्रवाशांनी तक्रारी करूनही मध्य रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक बी. मोदगील यांच्या काळात २००९ मध्ये सीएसटी स्थानकात ना नफा, ना तोटा या तत्त्वावर गरजू प्रवाशांच्या सोईसाठी गोल्फ कार सुरू केल्या होती. रेल्वेची रुपयाची गुंतवणूक नसतानाही चेन्नईतील सृष्टी कम्युनिकेशन कंपनीने स्वत: या कार स्थानकात उपलब्ध करून दिल्या होत्या. बॅंकांच्या जाहिरातीच्या बळावर या गोल्फ कारच्या चालकांचा पगार व इतर गोष्टींचा खर्च सहज निघत होता. दिवसभरात या कारच्या ६० फेऱ्या व्हायच्या. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे कारची संख्या दोन व मनुष्यबळाची संख्या १२ वर गेली. बॅंकांच्या जाहिरातीचे उत्पन्न महिन्याला सव्वा लाखावर पोहचले; मात्र पाच महिन्यांपासून दोन्ही कार फलाट क्रमांक चारच्या कोपऱ्यात धूळ खात पडल्या आहेत. कंपनीचा करार संपला असून, तो वाढवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. हेल्पलाईनवर प्रवाशांची विचारणा होत असली तरी ही कार दिली जात नाही. त्यामुळे सीएसटीच्या प्रवेशद्वारापासून फलाट क्रमांक १८पर्यंत जाणाऱ्या वृद्ध व अपंग प्रवाशांचे हाल होत आहेत. गोल्फ कारची सेवा बंद पडल्याने हाल झाल्याची तक्रार महाव्यवस्थापक कार्यालयापर्यंत पोहचल्या असून, एका अपंग प्रवाशाने केलेल्या तक्रारीची प्रत ‘सकाळ’कडे आहे.

बंद पडलेल्या गोल्फ कारचे टायर पंक्‍चर झाले असून, बॅटरी बंद पडलेल्या आहेत. जवळपास एक ते दीड लाखांचा खर्च कारच्या दुरुस्तीवर जाणार असून, कंपनीची ती तयारी असली तरी रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील चार कारही बंद पडल्या असून, तेथे हीच परिस्थिती आहे.

सीएसटी स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी चेन्नईतील सृष्टी कम्युनिकेशन कंपनीने दोन गोल्फ कार दिल्या होत्या. त्यातील एक कार वर्षापूर्वी बंद पडली होती. त्यानंतर दुसरी कारही पाच महिन्यांपासून बंद आहे. या कार सुरू कराव्यात म्हणून पाठपुरावा केला जात आहे; मात्र वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Web Title: Golf car