esakal | मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट

बोलून बातमी शोधा

Corona
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोनाचं सावट आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. मात्र,मुंबईकारांसाठी या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असून आतापर्यंत अनेक रुग्ण बरे झाले आहेत.

२२ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शहरात ८ हजार ९० कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. तर, याच दिवशी ७,४१० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यावेळी रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा ५० दिवस इतका होता. तर, २३एप्रिल रोजी पालिकेच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ७ हजार,२२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर त्याहीपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढून तब्बल ९,५४१ वर पोहोचली. ज्यामुळे आता एकूण कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्णवाढ दुप्पटीचा दर ५२ दिवसांवर पोहोचला. कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणात आणण्यास यश मिळेल.

हेही वाचा: शौचालयात फ्लश केल्यावर करोनाचा संसर्ग वाढतो?

२४ एप्रिलला ही ८हजार ५४९ रुग्ण बरे झाले आणि त्याच दिवशी ५ हजार ८८८ एकूण बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, गुरुवारपासून शनिवारपर्यंत मुंबईत नवीन रुग्णांच्या नोंदीपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

दिनांक - बरे होणाऱ्यांची संख्या  - नवीन रुग्ण

२२ एप्रिल - ८ हजार,०९० - ७,हजार ४१०

२३ एप्रिल - ९ हजार ५४१ - ७ हजार २२१

२४ एप्रिल - ८ हजार ५४९ - ५ हजार ८८८

रिकव्हरी रेट वाढला -

दरम्यान, मुंबईचा रिकव्हरी रेट वाढला असून ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, ५४ दिवसांवर रुग्ण दुप्पटीचा दर आहे. मात्र, सध्या मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या तीन दिवसात ७० च्या वर रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे.  गेल्या फक्त तीन दिवसांत २१८ कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. हे प्रमाण फेब्रुवारी अखेर आणि मार्चमध्ये दरदिवशी कमी नोंदवले जात होते. दररोज सरासरी ६ ते १० मृत्यू नोंदवण्यात आले होते. ज्यांची संख्या वाढून आता ७० वर पोहोचली आहे.

पंधरवड्यात कोरोनारुग्ण वाढीचा वेग निम्म्यावर -

दुसऱ्या लाटेत मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. आता कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. कोविड चाचण्यांची संख्या वाढवूनही रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. ४ एप्रिलला एका दिवसांत ११ हजार, १६३ एवढे सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले होते. पण, आता ही संख्या स्थिरावली असून ५ ते ७ हजाराच्या दरम्यान सध्या रुग्ण सापडत आहेत.

संपादन : शर्वरी जोशी