फ्लेमिंगो बोट सफारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

ठाणे खाडी परिसरातील ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्ष्यांना जवळून न्याहाळण्यासाठी डिसेंबरमध्ये बोट सफारी सुरू करण्यात आली आहे. या बोट सफारीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 1 डिसेंबरपासून 3000 पर्यटकांनी या बोट सफारीचा आनंद घेतला. याद्वारे कांदळवन कक्षाला 13 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

नवी मुंबई : ठाणे खाडी परिसरातील ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्ष्यांना जवळून न्याहाळण्यासाठी डिसेंबरमध्ये बोट सफारी सुरू करण्यात आली आहे. या बोट सफारीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 1 डिसेंबरपासून 3000 पर्यटकांनी या बोट सफारीचा आनंद घेतला. याद्वारे कांदळवन कक्षाला 13 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत ही बोट सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फ्लेमिंगोप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. 

ही बातमी वाचली का? चीनहून परतला, अन् त्याला भरली कोरोनाची धडकी!

खारफुटी आणि सागरी जैवविविधतेविषयी माहिती देणारे केंद्र (किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र) कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून "खेकड्यांची शेती', "खाडीनिरीक्षण', "फ्लेमिंगो दर्शन फेरी' असे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या बोट सेवेला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून वन विभागाच्या उत्पन्नातदेखील मोठी वाढ होत आहे. ठाण्याच्या खाडीत गुजरातच्या कच्छच्या रणातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे नोव्हेंबरमध्ये आगमन होते. साधारणतः डिसेंबर महिन्यात हे पक्षी मोठ्या संख्येने ऐरोलीतील खाडीकिनारी दाखल होतात. तर मान्सून सुरू झाल्यांनतर पुन्हा ते निघून जातात. या कालावधीत पक्षीप्रेमींसह पर्यटकांना त्यांना "याचि देही याचि डोळा' पाहता यावे, यासाठी ऐरोलीच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून बोट सफारी सुरू करण्यात आली. या बोट सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऐरोलीतील या सागरी जैवविविधता केंद्राच्या ठिकाणी मत्स्यालयदेखील उभारण्यात येणार आहे. या केंद्रात उरण येथे सापडलेल्या ब्ल्यू व्हेल माशांचा सांगाडादेखील ठेवण्यात आला असून, आता या ठिकाणी मत्स्यालय देखील उभारण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का...

प्रतिव्यक्ती 300 रुपये शुल्क 
ऐरोली केंद्रातून ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या बोटींच्या साह्याने पर्यटकांना 10 किलोमीटर खाडी परिसरात विहार करण्यात येत असून, फ्लेमिंगोचे दर्शन घडविले जात आहे. साधारण 45 मिनिटे बोटिंगमधून फिरवण्यात येत असून, एका बोटीमध्ये 24 व्यक्तींसाठी आसनव्यवस्था असलेल्या दोन बोटी आहेत. यासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये आकारण्यात येत आहेत; तर शनिवार-रविवारी फेरी शुल्क 400 रुपये आहे. कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत एकत्र फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी सात आसनी कौस्तुभ नावाची बोट उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

फ्लेमिंगो बोट सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याद्वारे फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 13 लाख रुपयांचे उत्पन्न गोळा झाले आहे. 
- एन. जी. कोकरे, अधिकारी, कांदळवन संरक्षण विभाग, ऐरोली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good Response to Flamingo Boat Safari