चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

चीनमधून भारतात परतल्यानंतर उरणच्या एका तरुणाच्या मनात कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयामार्फत त्याच्यावर विविध चाचण्या करून घेतल्या; मात्र या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले.

नवी मुंबई : जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोना विषाणूमुळे उरणच्या एका तरुणालाही अक्षरशः धडकी भरली होती. चीनमधून भारतात परतल्यानंतर त्याच्या मनात कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती होती. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाच्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयामार्फत विविध चाचण्या करून घेतल्या; मात्र या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

ही बातमी वाचली का? दैव देतं अन कर्म नेतं...त्यांच्यावर घरे गमावण्याची वेळ! 

उरणमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणारा एक 30 वर्षांचा तरुण चीनमध्ये शंनझेन नावाच्या शहरात शिक्षण घेण्यासाठी गेला होता; मात्र सध्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या वुहान शहरापासून जवळच्या अंतरावर तो राहत होता. जानेवारी महिन्याच्या दरम्यान कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सरकारच्या आदेशानंतर हा तरुण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीन सोडून मायदेशी परतला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची पहिली थर्मल चाचणीही करण्यात आली. ही चाचणी नकारात्मक आली; मात्र हा तरुण उरणला आपल्या घरी पोहोचल्यावर त्याला कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना? ही भीती मनात भरली होती. या भीतीमुळे त्याचे अंग थरथरले होते. मनात कोरोना विषाणूची दहशत असल्यामुळे पुरता घाबरलेल्या या तरुणाने तत्काळ उरणच्या आरोग्य विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. कोरोना विषाणूचे नाव ऐकून महापालिकेचे आरोग्य विभागातील डॉक्‍टर जरा दचकले, परंतु प्रत्यक्षात तरुणाची भेट झाल्यावर तो घाबरलेला पाहून त्याचे समुपदेशन केले. 

ही बातमी वाचली का? रोहित पवारांची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने बजावली नोटीस

विशेष कोरोना विभागात दाखल 
कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून गेलेल्या या तरुणाच्या मनाची समजूत होत नसल्याने अखेर त्याला सरकारने कस्तुरबा रुग्णालयात सुरू केलेल्या विशेष कोरोना विभागात दाखल केले. या ठिकाणी त्या तरुणाच्या सर्व चाचण्या पार पडल्या, परंतु चाचणीनंतर आलेल्या अहवालात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona threatens Uran's young man