चिखल, खड्डे तुडवत गणरायांना निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

कासा येथे पाच दिवसांच्या मूर्तीचे विसर्जन

कासा ः कासा परिसरात गणेशाच्या आगमनाबरोबरच वरुणराजाचेही आगमन झाल्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात खड्डे पडले असून रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे, चिखल तुडवतच शुक्रवारी पाच दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशाला निरोप देण्यात आला.

परिसरातील पाच दिवसांच्या २५ घरगुती; तर १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे कासा सूर्या नदीकिनारच्या घाटावर विसर्जन करण्यात आले. चारच दिवसांपूर्वी या घाटाचे उद्‌घाटन करण्यात आले. घाटावर सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी विकास व खासदार निधीतून सुमारे २२ लाख रुपये खर्च करण्यात आले.

विसर्जन सुरळीत होण्यासाठी नदीकिनारी बॅरिकेड, मंडप, वीज, निर्माल्यासाठी  कलश, सूचनाफलक लावण्यात आले होते. सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goodbye to the lord Ganesh people, crushing the pits.