मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: परवानग्या अयोग्य; आरोपपत्रही अवैध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मालेगाव येथे १० वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात घेतलेल्या सरकारी परवानग्या अयोग्य आहेत.

मुंबई: मालेगाव येथे १० वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात घेतलेल्या सरकारी परवानग्या अयोग्य आहेत. त्यामुळे दाखल केलेले आरोपपत्रही अवैध आहे, असा दावा गुरुवारी (ता. १) त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या दाव्याचे खंडन केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने ठेवलेल्या आरोपांच्या विरोधात पुरोहितने न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्या. इंद्रजित महंती आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पुरोहितच्या वतीने ॲड्‌. मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. 

पुरोहित लष्करातील अधिकारी आहे. त्या वेळी सरकार कोणाचे होते याबाबत आम्ही आरोप करत नाही. एनआयएने नियमांनुसार सरकारी परवानग्या घेतल्या नाहीत आणि पुराव्यांशिवाय आरोप दाखल केले, असा दावा त्यांनी युक्तिवादात केला.एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या दाव्याचे खंडन केले. 

मुकुल रोहतगी यांच्याबाबत आक्षेप
प्रसाद पुरोहित याच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांच्याबाबत निसार सय्यद या अर्जदाराने आक्षेप घेतला. रोहतगी ॲटर्नी जनरल होते, तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणांत त्यांनी एनआयए आणि राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडली होती. त्यामुळे आता ते या प्रकरणात आरोपीच्यावतीने बाजू मांडू शकत नाहीत, असा दावा ज्येष्ठ विधिज्ज्ञ बी. ए. देसाई 
यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government permission wrong against colonel prasad purohit