अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा आणि प्रकृतीची राज्यपालांना काळजी, थेट गृहमंत्र्यांना फोन

पूजा विचारे
Monday, 9 November 2020

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केल्याचं समजतंय. या फोनवर राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत गृहमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली आहे. 

मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारणही पेटताना दिसलं. अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केल्याचं समजतंय. या फोनवर राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत गृहमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज फोन केला.  अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

गोस्वामी मोबाईलवरुन सोशल मीडियावर लाईव्ह

अर्णब गोस्वामी सध्या तळोजा कारागृहात आहेत. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब यांनी मोबाईल फोन वापरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मोबाईल फोन वापरावर खातेनिहाय चौकशी करण्यात येतेय. अलिबागमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल वापरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही घटना अलिबागमधल्या क्वॉरटांईन सेंटरच्या शाळेत घडल्याचं बोललं जातंय. 

अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन म्हणून ठेवण्यात आले होते. 
याचवेळी न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचं समोर आलं आहे. मोबाईल वापरताना अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचं दिसलं. त्यानंतर गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा आला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याच आली आहे. 

अधिक वाचा-  NCBचं धाड सत्र सुरुच, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा

चार दिवस कोरोना सेंटरमध्ये राहिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अलिबागला नेण्यात आले होते. अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

Governor concerned over Arnab Goswami safety and health calls Anil deshmukh directly


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor concerned over Arnab Goswami safety and health calls Anil deshmukh directly