ठाण्यात जीपीएस कॅमेऱ्याचा वॉच

दीपक शेलार
सोमवार, 24 एप्रिल 2017

ठाणे -पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे होणारे प्रकार टाळण्यासाठी दरवर्षी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार ३१ मेपर्यंत ठाणे महापालिकेच्या १० प्रभाग समितीतील ११९ किलोमीटर लांबीच्या तब्बल ३०६ नाल्यांची साफसफाई अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. ठेकेदारांकडून नालेसफाईत हातसफाई केली जाऊ नये, यासाठी यंदा नालेसफाईच्या कामांवर जीपीएस कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे -पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे होणारे प्रकार टाळण्यासाठी दरवर्षी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार ३१ मेपर्यंत ठाणे महापालिकेच्या १० प्रभाग समितीतील ११९ किलोमीटर लांबीच्या तब्बल ३०६ नाल्यांची साफसफाई अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. ठेकेदारांकडून नालेसफाईत हातसफाई केली जाऊ नये, यासाठी यंदा नालेसफाईच्या कामांवर जीपीएस कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३०६ छोटे-मोठे नाले असून यात १३ मोठे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी निर्धारित कालावधीत नाल्यांची सफाई व्हावी, यासाठी यंदा तब्बल नऊ कोटींच्या ६५ कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू केल्या आहेत. त्यानुसार आठवडाभरात ठेकेदारांची नियुक्ती करून नालेसफाईला सुरुवात केली जाणार आहे. नालेसफाईसाठी ३१ मे पर्यंतची डेडलाईन असून, यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जीपीएस कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नाल्यांच्या सफाईपूर्वी आणि सफाईनंतरचा फोटो आणि व्हिडीओ शूटिंग अनिवार्य केले असल्याने ठेकेदारांवर करडी नजर राहणार आहे. यासाठी पालिकेने जिओ टेग आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, यंदा ठेकेदारांसाठी नालेसफाईचे काम डोकेदुखी ठरणार आहे. मेमधील नालेसफाईपासून पावसाळा संपेपर्यंत पाणी तुंबल्यास अथवा नुकसान झाल्यास ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येणार आहे.

नालेसफाईच्या कामातील पारदर्शकतेसाठी पालिकेने जीपीएस कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठेकेदाराने नाल्यातून किती डम्पर कचरा किंवा गाळ उपसून त्याची वाहतूक केली, याची सविस्तर माहिती मिळणार असल्याने अधिकारी व ठेकेदारांमधील साटेलोट्याला आळा बसणार असून कामातही कुचराई होणार नाही. नालेसफाईची वस्तुस्थिती तपासण्यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुपही स्थापन करण्याचे ठरले असून त्याद्वारे नालेसफाईचे फोटो तत्काळ अपलोड करून प्रशासनाद्वारे दैनंदिन कामाचा आढावा घेतला जाईल.
- डॉ. बी. एम. हळदेकर, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी, पालिका

शहरात कुठे व किती नाले?
मुंब्य्रात ३१ कि.मी.चे ९२ नाले, कळव्यात ९ कि.मी.चे ४७, रायलादेवीमध्ये १९ कि.मी.चे ३७, वर्तकनगरमध्ये १९ कि.मी.चे २५, मानपाडा १७ कि.मी.चे २६, नौपाडा साडेचार कि.मी.चे २४, वागळे भागात १२ कि.मी.चे २०, उथळसरमध्ये साडेसात कि.मी.चे २४ आणि कोपरीत चार कि.मी.चे ११ यासह अनेक छोटे-मोठे नाले आहेत. यातील १३ नाले मोठे आहेत. यात संघवी हिल्स ते कावेसर, वर्तकनगर थिराणी ते वृंदावन सोसायटी नाला, शिवाईनगर-उपवन नाला, कामगार हॉस्पिटल-कोरम मॉल नाला, वागळे रोड नं. १६ ते कोपरी, कोपरी-गांधीनगर, लुईसवाडी ते कचराळी, टिकुजिनीवाडी ते कोलशेत, बटाटा कंपनी, सूरज वॉटर पार्क नाला, कळवा-वाघोबानगर, मुंब्रा-खडीमशीन रोड, सम्राटनगर आणि उदयनगर आदी ठिकाणच्या नाल्यांचा समावेश आहे.

Web Title: The GPS Camera Watch in Thane