कल्याण-डोंबिवलीत दुभाजकांना गवताचा वेढा; अपघाताची शक्‍यता 

शर्मिला वाळुंज
Thursday, 1 October 2020

कल्याण-डोंबिवली शहरांच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी रस्त्याच्या दुभाजकांवर फूलझाडे, शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत, परंतु सध्या गवत, काटेरी झुडपांचा डोलारा या झाडांभोवती मोठ्या प्रमाणात वाढला असून ही फूलझाडे झाकली गेली आहेत. शहराची शोभा वाढवण्यासाठी लावण्यात आलेल्या झुडपांभोवती या गवतांचाच भार अधिक वाढल्याने दुभाजकांचीच 'शोभा' झाली आहे.

ठाणे : शहरांच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी रस्त्याच्या दुभाजकांवर फूलझाडे, शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत, परंतु सध्या गवत, काटेरी झुडपांचा डोलारा या झाडांभोवती मोठ्या प्रमाणात वाढला असून ही फूलझाडे झाकली गेली आहेत. शहराची शोभा वाढवण्यासाठी लावण्यात आलेल्या झुडपांभोवती या गवतांचाच भार अधिक वाढल्याने दुभाजकांचीच 'शोभा' झाली आहे.

क्लिक करा : कोरोना काळात दुरावा; प्रवासी वाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांची गाण्यातून साद  

शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर या रस्त्यांची शोभा वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकांवर कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाच्यावतीने विविध फुलांची, शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, पालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देत असल्याने शहरातील उद्याने, दुभाजक आदींच्या देखभाल-दुरुस्ती कामांकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

डोंबिवलीतील 90 फूट रोड, कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता, मानपाडा रोड, जुना निळजे पूल या रस्त्यांसह अनेक ठिकाणी दुभाजकांवर गवत वाढलेले दिसते. लॉकडाऊनच्या काळात या दुभाजकांची देखभाल दुरुस्ती पालिका प्रशासनास करता आलेली नाही. तसेच त्यानंतरही पावसाळा सुरू झाल्याने याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. परिणामी पावसाळ्यात या दुभाजकांवर रानगवत, झुडपे वाढली असून ती शोभिवंत झाडे, फुलझाडे त्यासमोरून झाकोळून गेली आहेत. यामुळे या दुभाजकांची सध्या शोभाच झालेली दिसते. 

काही ठिकाणी हे दुभाजक तुटले असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. 
कोरोनाचे संक्रमण कमी झाले नसले तरी दैनंदिन व्यवहारास पालिका हद्दीत सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेले पाच-सहा महिने ठप्प असलेल्या शहरातील विकासकामांकडे, नागरी समस्यांकडे, दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

क्लिक करा : उत्तर प्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल

या गवतांचा डोलारा एवढा वाढला आहे की काही ठिकाणी वाहनात बसलेल्या व्यक्तींना या वाढलेल्या झाडा झुडपांच्या फांद्या घासून जात आहेत. यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता असून पावसाने आता उघडीप दिल्याने दुभाजक, रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडा झुडपांची, गवताची छाटणी पालिका प्रशासनाने करावी, अशी मागणी होत आहे.

मानपाडा रोड, कल्याण रोडवरील दुभाजक अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. शिवाय त्यावर गवत वाढले असून झाडांची मुळेही त्यातून बाहेर आली आहेत. ही झाडे कधीही उन्मळून पडू शकतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- संदीप पवार, कल्याण 

90 फूट रोड व रेल्वे समांतर रस्ता, ठाकुर्ली रस्ता येथे दुभाजकांवर शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली. परंतु सध्या येथे झाडांच्या बाजूला गवताचा डोलारा वाढला आहे. त्यांची छाटणी होत नसल्याने ही झुडपे वाढतच आहेत. प्रशासनाने आता त्याकडेही लक्ष द्यावे. 
- सुमित गुरव, डोंबिवली 

-----------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grass on dividers in Kalyan-Dombivali; Chances of an accident