मुंबईकरांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 24 May 2020

आता राज्यातल्या तरुणांकडे हीच मोठी संधी असणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईत येत्या काही दिवसात विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध होणारेत. 

 

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेत. राज्यातली आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं चित्र आहे. अनेक नागरिकांनी आपली रोजीरोटी गमावली आहे. तर काहींच्या नोकऱ्याही गेल्यात. तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात रोजगार बुडाल्यानं अनेक मजूर आणि कामगार वर्ग आपआपल्या स्वगावी परतले. आता राज्यातल्या तरुणांकडे हीच मोठी संधी असणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईत येत्या काही दिवसात विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध होणारेत. 

शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. देशातले सर्वात मोठंमोठे बंदरही मुंबईजवळच आहेत. देशातील सर्वात मोठा व्यवसाय हा सोने-चांदीचा असून देशातील 65 टक्के हा व्यवसाय मुंबईतून चालतो. मुंबईतल्या सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि उत्तर प्रदेशातले लाखो कारागीर येथे काम करतात. या कारागीरांचा आकडा जवळपास 10 लाखांच्या घरात जातो. या 10 लाखांच्या मजुरांचा आकडा पाहिल्यावर त्यापैकी 80 टक्के कारागीर पगारी असून उर्वरित कारागीर हे गरजेनुसार काम करतात. पगारदारांपैकी 70 टक्के अर्थात सुमारे 5.40 लाख कामगार परप्रांतीय असून त्यापैकी जवळपास सर्व कामगार गावी परतलेत. त्यामुळे या कारागिरांच्या जागी स्थानिक तरुणांना कामाची सुवर्णसंधी आहे. यासाठीच स्थानिकांनी रोजगारासाठी पुढं यावं, असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई याआधी केलं आहे. 

सराफा व्यवसायदेखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. सॅनिटाईज करुन दुकानं सुरु करण्यासाठी सराफा तयार आहेत. ही दुकानं सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाता रोजगाराची गरज भासेल. पण सर्व कारागीर आपआपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांनी रोजगाराची संधी असल्याचं ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डॉमेस्टिक कौन्सिलचे संचालक मदन कोठारी यांनी सांगितलं.  

विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...

याव्यतिरिक्त मुंबईतला बांधकाम व्यवसाय पाहता तिथेही मोठ्या संख्येनं परप्रांतीय काम करतात. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात 75 हजार बांधकाम मजूर नोंदणीकृत आहेत. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात 35 हजारांचा आकडा आहे. यातील 80 टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे बांधकाम सुरु होताच या क्षेत्रात किमान 1 लाख रोजगार असेल.

 

वस्त्रोद्योगातही मुंबईकरांना मोठी संधी 

तयार कपड्यांसाठी मुंबईत मोठी बाजारपेठ आहे. मुंबईत जवळपास 8 हजार दुकानांसह यात 80 हजारांहून अधिक रोजगार गुंतला आहे. यातील 80 टक्के कामगार बाहेरचे आहेत. ते सुद्धा गावी परतल्यानं स्थानिकांना संधी उपलब्ध होणार आहे. सध्या नोकरवर्ग सर्व गावी परतला आहे. यामुळे दुकाने सुरू झाल्यानंतर रोजगार उपलब्ध नसेल. ती संधी स्थानिकांसाठी निर्माण होईल. मोठी दुकाने आधी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात 20 ते 25 हजारांचा तरी रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध होऊ शकणार असल्याचं किरकोळ वस्त्रोद्योग असोसिएशन महासंघाचे सचिव शैलेंद्र तिवारी आणि हरेन मेहता यांनी सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great job opportunities for Mumbaikars; Learn more