यूटीएस ऍपला भरघोस प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 11.06 टक्के जण यूटीएस ऍप वापरतात.

मुंबई : मध्य रेल्वेचे यूटीएस ऍप वापरणाऱ्यांची संख्या आठ लाखांच्या घरात गेली आहे. मुंबईतल्या स्थानकांमधील तिकीट खिडक्‍यांसमोरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने आणलेल्या या ऍप्लिकेशनला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील रेल्वेस्थानकांतील तिकीट खिडक्‍यांवरील गर्दी कमी करण्यासाठी 2015 मध्ये यूटीएस मोबाईल ऍप तयार केले. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (सीआरआयएस) यांनी हे ऍप विकसित केले होते. रेल्वेने मोबाईलवर उपलब्ध करून दिलेले हे ऍप्लिकेशन अनारक्षित (अनरिझर्व्हड्‌) तिकिटांसाठी आहे.

मागील दोन वर्षांत या ऍपकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यांनतर रेल्वे बोर्डाने या ऍपबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. या मोहिमेला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी 11.06 टक्के जण यूटीएस ऍप वापरतात. या ऍपद्वारे तिकीट काढल्यास प्रवाशांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे युजर्स वाढले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मुंबई विभागातील "यूटीएस युजर्स' 
एप्रिल 2017 : तीन लाख 74 हजार 
जून 2019 : सहा लाख 23 हजार 308 
19 ऑगस्ट : आठ लाख 23 हजार 200 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great response to the UTS app