हरभरा "झाडावर चढला'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मकर संक्रांतीच्या काळात बाजारात हिरव्या हरभऱ्याची मोठी आवक होते, पण या वर्षी हरभऱ्याची आवक कमी असल्यामुळे भाव वधारून किलोमागे 80 ते 100 रुपयांवर गेले आहेत.

मुंबई : मकर संक्रांतीच्या काळात बाजारात हिरव्या हरभऱ्याची मोठी आवक होते, पण या वर्षी हरभऱ्याची आवक कमी असल्यामुळे भाव वधारून किलोमागे 80 ते 100 रुपयांवर गेले आहेत. त्यातही बाजारात आलेल्या हरभऱ्याचा दर्जा खालावल्याचे सांगितले जाते. 

महत्वाची बातमी ः पोलिसांमुळे तक्रारदारांची संक्रांत गोड

दरवर्षी जानेवारीत हिरवागार हरभरा बाजारात दाखल होतो. यंदा अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले; त्यामुळे आवक कमी झाली आहे, असे प्लाझा भाजी मंडईतील विक्रेत्यांनी सांगितले. हरभऱ्याचा दर्जाही खालावला असून, पोपटी पिवळट हरभरा बाजारात आला आहे. दरवर्षी हरभऱ्याची पाल्यासह जुडी विक्रीसाठी येते; यंदा भाजीवाल्यांकडे सुटे दाणे पाहावयास मिळतात. काही ठिकाणी मूठभर हरभऱ्यांचा वाटा 20 रुपयांना विकला जात आहे. 

मातीच्या सुगडात हरभरा, बोरे, ऊस आणि गाजराचे तुकडे भरून वाण दाखवले जाते. उसाची एक कांडी 10 रुपयांना, गाजर 40 रुपये किलो, बोरे 20 रुपये वाटा असे भाव आहेत. भोगीची मिश्र भाजी बनवण्यासाठी घेवडा, गाजर, वांगी, शेंगदाणा, हरभरा, बटाटा आणि अन्य काही भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या भाज्यांच्या विक्रीत वाढ होते. आवक वाढल्यामुळे भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. भेंडी, तोंडली, फरसबी अगदी 20 रुपये किलोने मिळत आहे. 

-----

भाज्यांचे दर (किलो/रुपये) 
फ्लॉवर : 40 
कोबी : 30 
वांगी : 40 ते 60 
गाजर : 40 
भेंडी : 20 
ढोबळी मिरची : 20 
फरसबी : 20 
तोंडली : 20 
मटार : 50 
गवार : 30 
घेवडा : 30 
टोमॅटो : 20 
कोंथिबीर (जुडी) : 10 ते 20 
मेथी (जुडी) : 10 ते 20 
पालक (जुडी) : 10 ते 20 
कांदा (अडीच किलो) : 150 (घाऊक)  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: green gram prices hikes