INSIDE STORY : मुंबईतील जंबो कोविड केंद्रांवरील रुग्णभार होतोय हलका, वाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट

भाग्यश्री भुवड
Sunday, 16 August 2020

बिकेसीतल्या जंबो कोविड केंद्रात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

मुंबई : कोविड19 बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे रुग्ण सेवेत सुरु आहेत. मात्र, आता या कोविड सेंटरवरील भारही हळूहळू कमी होत चालला आहे.  कोविडसाठी अनेक रुग्णालयांचे पुर्णपणे कोविड सुविधेत रूपांतर करण्यात आले. मात्र, आता रुग्णालयांवरचा भार हलका होऊन रुग्णांना कोविड केंद्रात पाठवले जात आहे. आणि रुग्णालये पुन्हा पुर्वपदावर येत आहेत. आता कोविड केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन  तसेच ICU देखील उभारले आहेत. सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर येथे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील 120 खाटांचे आयसीयू अशा 3 हजार 520 बेड्सच्या जम्बो सुविधा 7 जुलै पासून मुंबईत सुरु करण्यात आली आहे. मात्र, सध्या जंबो कोविड केंद्रात रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असुन जवळपास 50 ते 60 टक्के एवढंच याचं प्रमाण आहे.  

मोठी बातमी - "झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री... समोर CBI दिसली की काय ???"

सुरूवातीच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यातून अनेकांनी आपला जीव गमावला. त्यावेळेस रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी देखील येत होत्या. मात्र, आता रुग्णाला सहज बेड उपलब्ध होत असल्याचे कोविड केंद्रातून सांगण्यात आले आहे. 

  • बिकेसीतल्या जंबो कोविड केंद्रात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
  • आयसीयू, डीसीएचसी आणि इतर बेड्स ही 60 टक्के भरलेले आहे आणि 40 टक्के रिक्त आहेत.
  • केंद्रात जे 1300 बेड्स ऑक्सिजन सह आणि ऑक्सिजन नसलेले आहेत ते रिक्त आहेत. 108 आयसीयू बेड्स पैकी 57 बेड्स रिक्त आहेत.
  • म्हणजे जवळपास 50 टक्के बेड्स रिक्त आहेत.
  • सध्या या केंद्रात 403 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर, आतापर्यंत 2 हजार 772 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काय आहेत सुविधा ? 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंबो कोरोना केअर सेंटर, समन्वयासाठी प्रत्येक वाॅर्डमध्ये वाॅर रुमच्या मदतीमुळे रुग्णांच्या तब्येतीनुसार त्यांना हलवले जाते. याच कारणामुळे बेड्ससाठी होणारी समस्या आता आटोक्यात येत आहे. याआधी रुग्णांना आयसीयू बेड्ससाठी रुग्णांलयांमध्ये फेऱ्या किंवा सतत विचारपूस करावी लागत होती. मात्र, आता ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या कोविड केंद्रात 
सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ICU बेड्स, रुग्णांचे समुपदेशन, फिजिओथेरेपी अशा सुविधांमुळे रुग्णांवर सकारात्मक बदल जाणवत आहे. 

कोणालाही बेडची गरज असेल तर बेड्स आता इथे उपलब्ध आहेत. आयसीयू किंवा कोणत्याही बेडसाठी रुग्णांना काळजी करण्याची गरज नाही. डायलिसीस सुद्धा सुरु करणार आहोत. त्यामुळे, रुग्णांनी इथे थेट उपचारांसाठी यावं. असं बीकेसी कोविड केंद्र संचालक डॉ. राजेश ढेरे यांनी म्हटलंय. 

वरळी कोविड केंद्रातील संख्या आटोक्यात 

वरळी येथील एनएससीआय कोविड केंद्रातील रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. 518 बेड्सची सुविधा असणाऱ्या या केंद्रात सद्यस्थितीत 217 रुग्ण दाखल असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 2 हजार 520 रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. 
तर, त्यातील 2 हजार 100 डिस्चार्ज जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सध्या 20 ते 25 असे रुग्ण दाखल होतात. कोविड केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. पल्स, ब्लड प्रेशर, कोमॉर्बिडीज तपासल्या जातात. ऑक्सिजन युक्त बेड्स आहेत, 20 आयसीयू, चेस्ट फिजिओथेरेपी, व्यायाम, योगाचे सेशन्स घेतले जातात. स्टीम थेरेपी दिली जाते. या सर्व उपचारांमुळे जवळपास 50 ते 60 टक्के रुग्ण कमी झाले आहेत.

मोठी बातमी - जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यावधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात

आता मुंबईतून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. उपनगरातून ठाणे, भांडुप, वसई, भाईंदर, नवी मुंबई, मुलुंड या परिसरातून रुग्ण येत आहेत. आधी एका वेळेस 70 ते 80 रुग्ण यायचे, आता ही संख्या कमी होऊन दररोज किमान 20 ते 30 रुग्ण येतात. आयसीयू बेड्सही लगेच उपलब्ध होत असुन आयसीयू बेड्सची गरज मोठ्या प्रमाणात लागत आहे. त्यासाठी आणखी 30 आयसीयू बेड्स वाढवणार असल्याची माहिती एनएनसीआय केंद्राच्या प्रमुख डॉ. निता वर्टी यांनी दिली आहे. 

लक्षणे नसलेले रुग्ण हल्ली होम आयसोलेशनमध्ये राहत असल्याने कोविड केंद्रावरील भार कमी झाला आहे. शिवाय, मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे, असे ही डॉ. वर्टी यांनी सांगितले आहे.

नेस्को कोविड केंद्रात एका ही मृत्यूची नोंद नाही - 

गेल्या 10 दिवसाआधी एका दिवशी साडे चारशेच्यावर रुग्ण येत होते. पण, आता ही संख्या 100 ने कमी होऊन 350 पर्यंत पोहोचली आहे. तर, दररोज 20 ते 30 नवीन रुग्ण येतात पण तेवढेच डिस्चार्ज देखील होतात. दरम्यान, या कोविड केंद्रात आतापर्यंत एकाही मृत्यू ची नोंद झालेली आहे.

मोठी बातमी - ब्रिज अजून बनलाही नाही तोवर आलेत नावांसाठीचे दोन प्रस्ताव, प्रशासन म्हणतंय...

आतापर्यंत 3 हजार 142 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यापैकी 2 हजार 466 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आधी 50 टक्के बेड्स भरलेले असायचे आहेत आता त्याचे प्रमाण 40 टक्के झाले आहे. काही कोविड केंद्रे बंद देखील झाले आहेत. तरीही तेवढ्या प्रमाणात गर्दी झालेली नाही.

याठिकाणी रुग्णाला सर्व सुविधा दिली जाते. वेलकम किट, अंथरुण, चार वेळेस जेवण आणि पाण्याची सुविधा अशा सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आधी 90 रुग्ण ऑक्सिजनवर असायचे आता 30 ते 35 रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते, अशी माहिती गोरेगाव नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. निलम आंद्रडे यांनी दिली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

ground zero report on jumbo covid centers of mumbai read inside story 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ground zero report on jumbo covid centers of mumbai read inside story