Mumbai : अपंगांसाठी मैदाने राखीव ; खेळांमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपंगांसाठी मैदाने राखीव ; खेळांमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेचा पुढाकार

अपंगांसाठी मैदाने राखीव ; खेळांमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेचा पुढाकार

मुंबई : अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. मुंबईतही अपंगांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी ठराविक कालावधीत मैदाने राखीव ठेवण्याबरोबरच त्यांना खेळाची साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालिकेत याबाबतचा ठराव मांडण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास मुंबईतील अपंगांना क्रीडा प्रकारात वाव देता येणार आहे.

भारतातील अपंग खेळांडूंनी या वर्षीच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. अपंगांना खेळाची संधी उपलब्ध करून दिल्यास जगभरात ते देशाचा झेंडा उंचावतात, त्याच बरोबर हे खेळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठीही आवश्‍यक असतात. केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकाही अपंगांच्या शिक्षणापासून त्यांच्या रोजगाराच्या विविध टप्प्यांवर सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवते. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये अपंगांना चार टक्‍क्यांपर्यंतचे आरक्षण आहे. मुंबईत मोकळ्या मैदानांची संख्याच अपुरी असून, आहेत त्या मैदानांमध्ये अपंगांना खेळण्यासाठी जागा मिळणेही अवघड आहे. त्यामुळे अपंगांना खेळाची संधी मिळत नाही.

या पार्श्वभूमीवर अपंगांनाही खेळ खेळता यावे, यासाठी मैदानांमध्ये ठराविक वेळ राखून ठेवावी. तसेच, त्यांना खेळाची विविध साहित्ये उपलब्ध करून द्यावीत, अशी ठरावाची सूचना भाजपचे हरिष छेडा यांनी मांडली आहे. या महिन्याच्या कामकाजात या ठरावाच्या सूचनेवर निर्णय होणार आहे. मुंबईसह उपनगरात महापालिकेची १ हजारच्या आसपास मैदाने आहेत. मात्र, ही मैदाने अपंगांना वापरता येतील, अशी तयार करण्यात आलेली नाहीत. अपगांमधील खेळांची आवड लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात मैदानांमध्ये अपंगांना पुरक सुविधा दिल्या जात आहेत. त्यात ठराविक कालावधीसाठी मैदाने आरक्षित झाल्यास दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: राहुल द्रविड कोच झाल्याचं आश्चर्य वाटलं, कारण... - पॉन्टींग

स्पर्धाही घ्याव्यात

मुंबईत एकूण लोकसंख्येत सुमारे २ टक्केच्या आसपास अपंग आहेत. त्यांना खेळाची मैदाने उपलब्ध करून, त्यांना खेळाचे साहित्य देण्याबरोबरच त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजनही पालिकेने करावे. त्यातून त्यांना खेळण्याचे प्रोत्साहनही मिळू शकते, असेही या ठरावाच्या सूचनेत नमद केले आहे. त्यासाठी मैदानांमध्ये अपंगांना आवश्‍यक खेळाची साधने कायमस्वरुपी तयार करता येऊ शकतील, असे हरिष छेडा यांनी ठरावात म्हटले आहे.

पालिकेत मांडलेला प्रस्ताव अत्यंत दिलासादायक आहे. मैदाने राखीव ठेवण्यासाठी मागणीही केली होती. तसे पत्र प्रशासनाला दिले होते. याबाबतचा निर्णय झाल्यास अपंगांना करमणुकीचे साधन मिळेल. तसेच, मैदानी खेळांमुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यही सुदृढ होईल. अपंगांच्या खेळांना वाव मिळाल्याने भविष्यात त्यांच्यातून चांगले खेळाडू अधिक प्रमाणात तयार होतील. यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

- मंगेश मालवणकर, दिव्यांग विकास संघ, मुंबई

loading image
go to top