रायगड जिल्हा परिषदेत म्हणून गटबाजी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीचे नाट्य अवघ्या दहा मिनिटांत संपले. पालकमंत्रीपदावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी या निवड प्रक्रियेमध्ये भाग न घेतल्याने चार सभापतींची निवड बिनविरोध झाली.

अलिबाग ः अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीचे नाट्य अवघ्या दहा मिनिटांत संपले. पालकमंत्रीपदावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी या निवड प्रक्रियेमध्ये भाग न घेतल्याने चार सभापतींची निवड बिनविरोध झाली. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी दोन-दोन पदे घेतली; तर कॉंग्रेसला डावलले. त्यामुळे गटबाजी वाढली आहे.

चार सभापतिपदांसाठी चार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. राष्ट्रवादीकडून गीता जाधव, बबन मनवे आणि शेतकरी कामगार पक्षाकडून ऍड. नीलिमा पाटील, दिलीप भोईर यांचे अर्ज आले होते. यातील बबन मनवे यांची पहिल्यांदाच सभापतिपदावर निवड होत आहे; तर इतर तिघांनी यापूर्वी वेगवेगळ्या विषयांचे सभापतिपद भूषवले आहे. या निवडीतून कॉंग्रेसलाही डावलण्यात आले आहे.

गुड न्यूज : मुंबईकरांनो ‘त्या’ आनंदी दिवसासाठी सज्ज रहा

दुपारी बरोबर दोन वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा सुरू झाली आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड होत असलेल्या सदस्यांची नावे वाचत ही सभा संपविण्यात आली. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष (23 सदस्य) आणि राष्ट्रवादी (12 सदस्य) आणि कॉंग्रेस (3 सदस्य) या पक्षांची आघाडी आहे. राज्यातील नव्या सत्ता समीकरणानुसार निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचे सूत्र शेकाप आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी नाकारल्याचे शिवसेनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

हे वाचा : भाजपच्या मुंबई अध्यक्षांना पाहिलंत का?

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीतही शिवसेनेला स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये नाराजी खदखदत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सहभागी न होता विरोधात बसण्याचा निर्णय मंगळवारी रोहा येथे झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत घेण्यात आला होत. त्यानुसार बुधवारी (ता.15) झालेल्या विषय समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याच्या सूचना शिवसेनेच्या नेत्यांनी सदस्यांना दिल्या होत्या. 
............................ 
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी 
अध्यक्ष ः योगीता पारधी (शेतकरी कामगार पक्ष) 
उपाध्यक्ष ः सुधाकर घारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
सभापती ः गीता जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
सभापती ः ऍड. नीलिमा पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 
सभापती ः बबन मनवे (राष्ट्रवादी) 
सभापती ः दिलीप भोईर (शेतकरी कामगार पक्ष) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grouping in Raigad ZP