esakal | मुंबईत घर खरेदीला वेग; ऑक्‍टोबरमध्ये तब्बल सात हजारांवर घरांची विक्री 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत घर खरेदीला वेग; ऑक्‍टोबरमध्ये तब्बल सात हजारांवर घरांची विक्री 

कोव्हिडमुळे गृहनिर्माण क्षेत्र मंदीचा सामना करत असताना ऑक्‍टोबरमधील गृह खरेदीने चांगलाच जोर पकडल्याचे चित्र आहे.

मुंबईत घर खरेदीला वेग; ऑक्‍टोबरमध्ये तब्बल सात हजारांवर घरांची विक्री 

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई ः कोव्हिडमुळे गृहनिर्माण क्षेत्र मंदीचा सामना करत असताना ऑक्‍टोबरमधील गृह खरेदीने चांगलाच जोर पकडल्याचे चित्र आहे. या महिन्यात मुंबईत तब्बल सात हजारांपेक्षा अधिक घरे विकली गेली आहेत. कोव्हिडपूर्व काळातील जानेवारीमध्ये झालेल्या घर विक्रीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. मुद्रांक शुल्क कपातीमुळे घर खरेदीला चालना मिळाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ

कोव्हिडचे संकट पूर्णपणे कमी झाले नसताना ऑक्‍टोबरमध्ये मुंबईत एकूण 7229 घरे विक्रीची नोंद झाली. जानेवारीमध्ये 6150 घरे विकली गेली होती. ऑक्‍टोबरमध्ये नवरात्र, दसरा, दिवाळीची सुरुवात होते. त्यामुळे ऐरवी या महिन्यात घर खरेदी बऱ्यापैकी होत असते. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये 5811 घरे विकली गेली होती. कोव्हिडचा धोका कमी झाला नसूनही गेल्या वर्षापेक्षा या वेळी जास्त घरे विकली गेली आहेत. 

कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम थांबले होते, तर या काळात अनेक बांधकाम मजूर आपापल्या राज्यात निघून गेले. त्यामुळे प्रकल्प सुरू होऊनही मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घर खरेदीला चालना मिळेल की नाही यात साशंकता होती; मात्र ऑक्‍टोबरच्या आकडेवारीने हे चित्र पूर्णपणे बदलून गेल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

सरकारी तिजोरी रिकामीच 
घर खरेदीसाठी विकासकांनी जाहीर केलेल्या आकर्षक ऑफर, शून्य मुद्रांक शुल्क आकारणी आणि कोव्हिडच्या धसक्‍यामुळे अनेक मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कमी दराने विक्रीला काढल्याचा हा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात केली. त्यामुळे घर खरेदीला चालना मिळाली आहे; मात्र जादा घरे विक्री होऊनही सरकारी तिजोरीत जमा झालेली रक्कम मात्र घटली आहे. जानेवारीमध्ये मुद्रांक शुल्कापोटी 454 कोटी रुपये जमा झाले होते, तर ऑक्‍टोबरमध्ये जानेवारीपेक्षाही अधिक घरे विकूनही सरकारी तिजोरीत 232 कोटी रुपये जमा झाले. गेल्या वर्षी याच महिन्यात 442 कोटी रुपये जमा झाले होते.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image