शून्य टक्के निकालाच्या शाळांत वाढ; 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्याही घटली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

राज्यात शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी 33 वर मर्यादित असलेल्या शून्य टक्के शाळांचा आकडा यंदा थेट 209 वर पोहचला आहे. 

मुंबई : दहावी निकालामध्ये यंदा राज्यभरातील 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी चार हजार 28 शाळांचा निकाल 100 टक्के लागला होता. यामध्ये यंदा घट झाली असून 100 टक्के निकाल एक हजार 714 शाळांचा लागला आहे. तसेच राज्यात शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी 33 वर मर्यादित असलेल्या शून्य टक्के शाळांचा आकडा यंदा थेट 209 वर पोहचला आहे. 

मुंबई विभागात 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या यंदा कमी झाली आहे. यंदा मुंबईत फक्त 331 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. एकीकडे 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या कमी झाली आहे. दहावी अभ्यासक्रमात झालेला बदल आणि परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आल्याने निकाल खालावला आहे. त्याचा थेट परिणाम शाळांच्या निकालावर दिसून आला आहे. 

गेल्या वर्षी 100 टक्के निकालाचे बिरुद मिरवणाऱ्या अनेक शाळांना यंदा निकालाची नव्वदी पार करतानादेखील नाकीनऊ आले आहे. राज्यभरातून तब्बल एक हजार 794 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण यंदाच्या तुलनेत 50 टक्‍क्‍यांनी जास्त होते. गेल्या वर्षी 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या चार हजार 28 इतकी होती. यंदा पुण्यात सर्वाधिक शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पुण्यातील एकूण तीन हजार 490 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतील 331 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यानंतर कोल्हापूर विभागातील 303 शाळांचा समावेश आहे. 

मुंबईतील 41 शाळांचा निकाल शून्य टक्के 
राज्यभरात यंदा शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 209 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून गेल्या वर्षी हा आकडा 33 इतकाच होता. राज्यात नागपूर विभागात शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे. नागपुरात यंदा 45 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे 42 आणि त्यानंतर मुंबईतील 41 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळांना लवकरच कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असून त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Growth in Zero percent assessment Schools; The number of schools of 100 percent is also reduced