अकरावी प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्रावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कागदपत्रांची पडताळणी बंधनकारक : अर्जामधील त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय 

मुंबई : दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी होऊ लागल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर मार्गदर्शन केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अर्जातील त्रुटी दूर होऊन, त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. 

दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार फेरपरीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, या विद्यार्थ्यांकडे परीक्षेचे दोन निकाल असल्याने त्यांना अर्जात गुण भरणे, जात प्रमाणपत्राची माहिती भरणे, तसेच फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेच्या निकालापूर्वी या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्या वेळी त्यांनी त्या वेळचा आसन क्रमांक अर्जात नोंदवला होता.

परंतु, फेरपरीक्षेच्या वेळी त्यांना दुसरा आसन क्रमांक दिल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या संदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अनेक तक्रारी येत होत्या. तक्रारदार विद्यार्थ्यांच्या शंकांचे कार्यालयातून निरसन करण्यात आले तरी अन्य विद्यार्थ्यांकडून चुकीचा अर्ज भरला जाऊ शकतो. त्यामुळे ते प्रवेशप्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ नयेत यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या विद्यार्थ्यांना दोन भागांत अर्ज भरून झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रावर जाणे बंधनकारक करण्यात आले, अशी माहिती या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या परिसरात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे प्रवेशासाठीच्या नावनोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु, पावसाने विश्रांती घेतल्यावर शुक्रवारी (ता. 6) मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली. तसेच शनिवारी (ता. 7) यात आणखी वाढ होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

अतिरिक्त तास घेण्याचे निर्देश 
दरम्यान, मुंबई विभागातील महाविद्यालये सुरू झाली असून, गणपतीच्या सुटीनंतर पहिली सत्र परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. तेव्हा उशिरा दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे निर्देशही शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the Guidance Center for the Eleventh Admission