उल्हासनगरात साडेसहा लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

दिनेश गोगी
शुक्रवार, 17 मे 2019

- टेम्पोचा अपघात झाल्याचा आला होता फोन.

- त्यानंतर करण्यात आली ही कारवाई.

उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.  

उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद टेम्पोतून आणला जातो. काल गुरुवारी सायंकाळी पेन्सिल फॅक्टरीजवळील विठ्ठल मंदिराजवळ एक टेम्पो अपघातग्रस्त झाल्याचा कॉल कंट्रोल रममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला.वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांच्या सूचनेनुसार पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, कॉन्स्टेबल सुनील रसाळ, राजेश डोंगरे, पोलिस हवालदार शितल माने, विनोद कदम हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त टेम्पोची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाच्या 15 गोण्या होत्या. या गोण्यामध्ये असलेला गोवा आणि विमल गुटखा ताब्यात घेतला आहे.

पोलिसांना अपघातग्रस्त टेम्पोची मदत करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांनी तत्परता दाखवून टेम्पोत काय आहे, याची तपासणी केल्यामुळेच साडे सहा लाख रूपयांचा गुटखा आढळून आला, अशी माहिती देताना पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त धूळ टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे रमेश भामे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka seized by police of Rs 6 and Half lakhs in Ulhasnagar