... तर गुटखामाफिया जीव घेतील - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 जून 2018

मुंबई - राज्यात बंदी असतानाही खुलेआम गुटख्याची विक्री, उत्पादन केले जात आहे. गुजरातसह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणला जात आहे. मी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे; मात्र, सरकार कारवाई करीत नसल्यानेच पोलिसांना धमकी देण्यापर्यंत या माफियांची मजल गेली आहे. उद्या हे माफिया एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलिसांना दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रश्नाच्या मुळाकडे लक्ष वेधले आहे. गुटखा बंदीबाबत आपण मार्च अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तेव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकी देण्यात आली. आता गुटखा गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्‍या दिल्या जात आहेत. उद्या हे गुटखामाफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत. मुख्यमंत्री, अन्न व नागरीपुरवठा मंत्री यावर काही कारवाई करणार आहेत का नाही? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांना गाडी सोडण्यासाठी धमकी देणे, हे प्रकरण गाडी सोडण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यामागे राज्यातील गुटखामाफियांची शक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कारवाई कधी करणार
सध्या गाजत असलेल्या एका व्हिडिओ क्‍लिपमध्ये उल्लेख केलेली गुटख्याची गाडी सोडली का? या गाडीवर काय कारवाई केली? संबंधित गाडीच्या मालकाच्या आणखी किती गाड्या आहेत? पोलिसांना धमकी दिल्याबद्दल काय कारवाई केली, का दबावाखाली प्रकरण मिटवले? असे अनेक प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केले आहेत. राज्य सरकार कारवाई करणार की हे प्रकरण दडपणार? अशी विचारणाही मुंडे यांनी केली आहे.

Web Title: gutkhamafia crime dhananjay munde