हाफकिन कोरोनाकाळात करतेय काय? आराखडा सादर करण्याचे आदेश

मृणालिनी नानिवडेकर
Wednesday, 23 September 2020

हाफकिन संस्थेने आतापर्यंत केलेले संशोधन कार्य पाहता येणाऱ्या काळात संशोधनाची प्रक्रिया कशी असेल, संशोधन पध्दतीचा रोडमॅप कसा असेल याबाबतही आराखडा सादर करावा.

मुंबई ,ता.२३ : कोरोना काळात हाफकिन संस्थेने लस विकसित करण्यावर भर द्यावा आणि हे आव्हान पेलण्यासाठी बदल सुचवणारा आराखडा तीन आठवडयात सादर करण्याचे आदेश आरोग्यशिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे. हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा  सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
 
मंत्रालयात हाफकिन संस्थेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिनच्या संचालक शैला ए यांच्यासह हाफकिन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाची बातमी : तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस

देशमुख म्हणाले की, हाफकिन संस्थेने सध्याची राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता, तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने आजपर्यंत कॉलरा, रेबीज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक रोगप्रतिबंधक लसी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे कोविड -19 साठी लस शोधून काढण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन येथे होणे आवश्यक आहे. आज राज्यभरात कोविडच्या तपासण्या शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत,परंतु हाफकिन संस्था ही तपासणीमध्ये प्रमुख मानली जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आज हाफकिन संस्थेत तपासण्या होत असल्या तरी त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
 
हाफकिन संस्थेने आतापर्यंत केलेले संशोधन कार्य पाहता येणाऱ्या काळात संशोधनाची प्रक्रिया कशी असेल, संशोधन पध्दतीचा रोडमॅप कसा असेल याबाबतही आराखडा सादर करावा. तसेच हाफकिन संस्थेत कंत्राटी पध्दतीने संचालक पदाची भरती किंवा ॲड ऑन पध्दतीने पदभरती करताना, संचालक किंवा अधिकारी -कर्मचारी यांना नियुक्ती देताना त्यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी याबाबत सर्व नियम तपासून पाहण्यात यावे असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

( संपादन - सुमित बागुल )

haffkine institute asked to submit their action plan amid corona amit deshmukh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haffkine institute asked to submit their action plan amid corona amit deshmukh