लोटाप्रेमी हाजीर हो!

संजय मिस्कीन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - गावातल्या जिल्हा परिषद शाळेचं मैदान... मैदानात न्यायालयासारखी केलेली रचना... समोर तीन ते पाच शाळकरी विद्यार्थी न्यायाधीशांचे पॅनेल... मैदानाच्या गेटवर एक पांढऱ्या शुभ्र पोशाखातला न्यायालयात असतो तसा "पट्‌टेवाला' विद्यार्थी... आजूबाजूला गावकरी, अधिकारी व शाळेतील विद्यार्थी... तेवढ्यात आवाज येतो... "केशव चव्हाण हाजीर हो..!' सदरील आरोपी विद्यार्थी न्यायाधीशांच्या समोर उभा राहतो. त्याला पकडलेला विद्यार्थी न्यायाधीशांना सांगतो की, 'माननीय न्यायाधीश, संबंधित व्यक्ती आज सकाळी शौचास बाहेर गेले होते. त्यांना अमूक-अमूक ठिकाणी आम्ही रंगेहाथ पकडले.'' त्यावर न्यायाधीश आरोपी "लोटाप्रेमी'ला विचारणा करतात. आरोपीने कबुली दिली असता न्यायाधीश निवाडा देतात की, ""बाहेर शौचास बसणे हा गुन्हा आहे. तुम्ही तो केला आहे. आता तुम्ही सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या काळजीबाबत दोषी आहात. तुम्हाला दंड अथवा फौजदारी गुन्ह्याची शिक्षा देणार नाही. तर आम्ही तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावतो!''

हा सगळा प्रकार घडला तो उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्‍यात. विस्तार अधिकार व्ही. जे. वाघमारे यांच्या या संकल्पनेतून हागणदारीमुक्त तालुका करणारा हा विद्यार्थी अदालतीचा "भूम पॅटर्न'.
केंद्र व राज्य सरकारने हागणदारीमुक्‍त गावांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. प्रचार व प्रचार केला; पण फारसा प्रतिसाद मिळत असला, तरी अशा प्रकारच्या या अभिनव उपक्रमातून हा संपूर्ण तालुका हागणदारीमुक्‍त झाला आहे.

भूम तालुक्‍यात स्वच्छता मोहीम रावबताना सामाजिक जाणीव जिवंत करण्यास प्राधान्य दिले. ज्या नागरिकांना पकडले त्यांच्यावर कुठेही फौजदारी गुन्हा नोंदवला नाही. मात्र, दंड वसूल केला, पण "विद्यार्थी अदालती'चा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
- व्ही. जे. वाघमारे, विस्तार अधिकारी, भूम (जि. उस्मानाबाद)

- हागणदारीमुक्‍तीचा राज्यातला प्रभावी प्रयोग
- विद्यार्थी न्यायालयाचे "स्वच्छ यश'
- विद्यार्थी न्यायालयात सामाजिक स्वच्छतेची शिक्षा
- सात लाख 88 हजारांचा दंड जमा
- 49 महिला ग्रामपंचायतीत दंडातून शौचालये

Web Title: hagandari free bhoom pattern fine