
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कर्मचाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली.
मुंबई : पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कर्मचाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. दीपक शिरसाठ (41) असे अटक करण्यात आरोपीचे नाव असून, तो नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान कंपनीत कार्यरत होता.
भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांची, त्यातील संवेदनशील तांत्रिक तपशील, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती हा कर्मचारी आयएसआय या संघटनेला पाठवित असल्याचे समोर आले होते. सहा महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्याला फेसबुकवर एका तरुणीची मैत्रीसाठी विनंती आली. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये संभाषण सुरू झाले होते. प्रथम जुजबी संभाषण सुरू असतानाच, हे संभाषण खासगी आयुष्याकडे वळले. यावेळी दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक, तसेच छायाचित्रांचे आदानप्रदान केले. मात्र या छायाचित्र आणि माहितीवरून या तरुणीने त्याला ब्लॅकमेल करीत अनेक संवेदनशील माहिती काढून घेण्यास सुरुवात केली. याची माहिती एटीएसला समजताच, त्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून, तो सर्व गोपनीय माहिती या संघटनेस पुरवत होता. त्याच्याविरुद्ध कलम 3, 4 आणि 5 शासकीय गुपित अधिनियम 1923 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
दहा दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी दीपक शिरसाठकडून तीन मोबाईल, पाच सीम कार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. या आरोपी कर्मचाऱ्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)