चिठ्ठीतून निवडला आमदार

चिठ्ठीतून निवडला आमदार

महाड (बातमीदार) : विधानसभा, लोकसभा निवडणुका सुरू झाल्या की चौकाचौकांमध्ये नेहमीच चर्चेला उधाण येते. विधानसभेच्या चुरशीच्या लढतीचे अनेक किस्से बैठकीत हमखास रंगत असतात. महाडमध्ये जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळी चिठ्ठी टाकून झालेल्या आमदारांच्या निवडणुकीची चर्चा रंगते. यामुळेच महाडमध्ये झालेली ही निवड राजकीय इतिहासामध्ये अविस्मरणीय ठरली. 


महाड विधानसभा मतदारसंघात समाजवादी, जनता पक्ष, कॉंग्रेस व शिवसेना अशा विविध विचारसरणीच्या पक्षांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्या काळीही महाड हे राजकीयदृष्ट्या गजबजलेले असायचे. 1962 ची विधानसभा निवडणूक महाडकर कधीही विसरणार नाहीत. त्याकाळी वृत्तवाहिन्या असत्या तर या निकालाची बातमी गाजली गेली असती. 1962 च्या या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसकडून शंकरराव सावंत आमदारकीसाठी निवडणूक रिंगणात होते, तर प्रजा समाजवादी पक्षाचे सखाराम साळुंखे त्यांच्याविरोधात रिंगणात होते. त्यांच्यासह अन्य तीन उमेदवारही लढत होते. त्या काळी महाड विधानसभा मतदारसंघावर समाजवादी पक्षाचा मोठा पगडा होता. या पक्षाचे नानासाहेब पुरोहित आणि कॉंग्रेसचे शंकरराव सावंत अशा राजकीय नेत्यांचे वर्चस्वही होते.

1962 च्या निवडणुकीमध्ये महाड मतदारसंघांमध्ये 58 हजार 162 मतदार होते. त्यापैकी 34 हजार 13 मतदारांनी मतदान केले होते. आता मतदारांची ही संख्या तब्बल तीन लाखांच्या घरात गेली आहे. या वेळी झालेल्या 1962 च्या निवडणुकीची मतमोजणीही सुरू झाली. शंकरराव सावंत व त्यांचे प्रतिस्पर्धी सखाराम साळुंखे या दोघांनाही 12 हजार 664 अशी समसमान मते मिळाली. उर्वरित उमेदवारांमध्ये अपक्ष बा. गो. मोरे यांना 5 हजार 609, संयुक्त महाराष्ट्र समितीचे र. बा. मोरे यांना 2 हजार 50 आणि जनसंघाचे लक्ष्मणराव मालुसरे यांना 1 हजार 27 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर निवडणुकीचा निकाल देण्याची कसरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आली. या वेळी दोन्ही उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून एक चिठ्ठी उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी शंकरराव सावंत यांच्या नावाची चिठ्ठी उचलली गेली. शंकरराव सावंत त्याद्वारे चिठ्ठीने आमदार झाले. 

भाग्याची साथ 
महाडच्या नव्हे तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिठ्ठीने आमदार होण्याची ही पहिलीच घटना अविस्मरणीय आणि नावीन्यपूर्ण अशी होती. आजही महाडमध्ये ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळी शंकरराव सावंतांच्या चिठ्ठीने झालेल्या निवडीची हमखास चर्चा होत असते. राजकारणात संघटना, प्रचार, संपर्क याबरोबरच भाग्यही लागते, हे या निवडणुकीने दाखवून दिले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com