हनुमाननगरला मुबलक पाणी मिळणार

हनुमाननगरला मुबलक पाणी मिळणार
हनुमाननगरला मुबलक पाणी मिळणार

नवी मुंबई : तुर्भे परिसरातील हनुमाननगर येथील नागरिकांची पाणीटंचाईच्या समस्येतून अखेर सुटका झाली आहे. या परिसरात १५ लाख लिटर क्षमतेचे उच्चस्तरीय व त्यापेक्षा कमी लिटर क्षमतेचे भूस्तरीय जलकुंभ तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय ६ हजार ४६ मीटर इतक्‍या लांबीची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. 

हनुमाननगर व शेजारच्या परिसरात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण १२ हजार ३९० लोकसंख्या आहे, तसेच २००० पूर्वीच्या झोपडपट्टी सर्वेक्षणानुसार या भागात तब्बल एक हजार ९५९ इतक्‍या झोपड्या पात्र ठरल्या आहेत. महापालिकेच्या नव्या धोरणानुसार पात्र झोपडीधारकांना आता वैयक्तिक नळजोडणी देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ५८६ घरांना वैयक्तिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित पात्र झोपडीधारकांना या नळजोडण्या देण्याचे काम सुरू आहे. 

हनुमान नगरमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे त्यांची पाणीपुरवठा करण्याची क्षमता कमी झाली आहे. तसेच वैयक्तिक नळ जोडण्यांचा भारही वाढल्यामुळे त्याच नळजोडण्यांमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन नागरिकांना सुरळीत पाणी पोहोचण्यास विलंब होत होता. त्यामुळे याबाबत स्थानिक माजी नगरसेवक अमित मेढकर व नगरसेविका पूजा मेढकर यांनी वारंवार प्रशासनाकडे पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

या विकासकामावर पालिकेकडून पाच कोटी ६५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे जलकुंभाच्या उभारणीमुळे हनुमाननगरचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटणार आहे. 
- अमित मेढकर, माजी नगरसेवक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com