लाॅकडाऊनमुळे समुद्र किनारे सुखावले...

File Photo
File Photo

विरार : एका बाजूला कोरोनामुळे हाहाकार उडाला असताना दुसऱ्या बाजूला मात्र निसर्गाने श्‍वास घेण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे हवेच्या प्रदूषणाबरोबरच समुद्रातील पाण्याच्या प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रदूषणकारी कारखाने बंद असल्याने समुद्रात सोडले जाणारे रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणामुळे किनाऱ्यावर व खाडी भागात नष्ट झालेले मासे पुन्हा दिसू लागले आहेत. लहान माशांमुळे मच्छीमारांची उपजीविका होण्यास सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊनमुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील शेकडो रासायनिक कारखाने सध्या बंद आहेत. त्यामुळे सध्या मच्छीमारांना समुद्रातील प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागत नसून आपोआपच प्रदूषणात कपात झाल्याने पालघरच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील दांडी, उच्छेळी, मुरबे, नवापूर या मच्छीमारी करणाऱ्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिणामी समुद्र किनाऱ्यावर व खाडी भागात लहान मासेमारी करण्याची आशा मच्छीमारांना दिसू लागली आहे. गेल्या १० वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रातील वाढलेल्या प्रदूषणामुळे येथील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होती.

औद्योगिक परिसरात मोकळा श्‍वास
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कारखान्यांमुळे औद्योगिक क्षेत्र परिसरात हवेचे प्रदूषण बंद झाले. रात्रीच्या वेळी सोडला जाणारा विषारी वायू यामुळे तारापूर भागात नागरिकांना श्‍वसनाचे त्रास उद्भवत होते. मात्र गेल्या १० दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यांमुळे नागरिकांना मोकळा श्‍वास घेता येत आहे.

लॉकडाऊननंतर काय?
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखाने रासायनिक सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नैसर्गिक नाल्यातून ते समुद्रात सोडतात. परिणामी खाडी किनारी मिळणारे मासे नाहीसे होऊन येथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र मागील आठ दिवसांपासून येथील कारखाने बंद असल्याने रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले. शासनाने ही परिस्थिती पाहून लॉकडाऊननंतर येथील कारखान्यांना योग्य समज आणि आदेश द्यावे, जेणेकरून हे समुद्र किनारे स्वच्छ दिसतील, अशी मागणी लोकांनी केली.

Happy beaches because of the lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com