बत्ती गुल मीटर चालू ! वाढीव वीजबिलाने नागरिकांना फुटला घाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आधीच चाकरमान्यांच्या वर्क फ्रॉम होमचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात महावितरण कडून वाढीव वीजबिलाने ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आधीच चाकरमान्यांच्या वर्क फ्रॉम होमचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात महावितरणकडून वाढीव वीजबिलाने ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. लॉकडाऊन नंतर विजबिलात अचानक वाढ होत असल्याने सरासरी विजबीलासाठी महावितरण नेमकी कुठली पद्धत अवलंबत आहे? असा सवाल  नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर सोशल मीडियावरही नागरिकांनी महावितरण विभागाला ट्रोल करत  समाचार घेतला आहे.

हे ही वाचा : आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

डोंबिवली जवळील खोणी गावातील अनेक ग्राहकांना जवळपास दहा पटीने वीजबिल आकारण्याचा महाप्रताप महावितरणाने केला आहे. खोणीतील जवळपास 25 ग्राहकांनी वाढीव बिलासंदर्भात तक्रार केली आहे. याच परिसरातील ऑर्किड इमारतीत राहणारे संजय डागळे यांचे घर सहा महिन्यांपासून बंद असून त्यांनी घरात कोणतेही उपकरण बसवले नाही. मीटर लावल्यानंतर सुरवातीला त्यांना दोन महिने 150 रुपये बिल आले होते. मात्र मार्च महिन्याचे तब्बल 8 हजार 730 इतके बिल धाडण्यात आले. तर एप्रिल महिन्याचे बिल 230 रुपये देण्यात आले. सोसायटीतील अनेक लोकांना मार्च, एप्रिल महिन्याचे वाढीव बिल आकारण्यात आले आहे.

नक्की वाचा : मुलांनो तयारीला लागा! 'या' दिवसापासून शाळा सुरु होण्याची शक्यता

तक्रारीचे निवारण करणार
ग्रामीण भागासोबतच कल्याण आणि डोंबिवली शहरात वाढीव वीजबिल पाहून नागरिकांनी डोळे विस्फारले आहेत. आमच्या मागील बिलांप्रमाणेच सरासरी बिल द्यावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान मे महिन्यात महावितरण किती बिल देते? याची नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असून लॉकडाऊन नंतर नवीन बिलं देऊ असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

Harassment of citizens due to increased electricity bills Dissatisfaction with MSEDCL


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harassment of citizens due to increased electricity bills Dissatisfaction with MSEDCL