चर्चगेट स्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची मुजोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

प्रवाशांना भररस्त्यातच उतरवले जात असल्याने अपघाताची भिती, पोलिसांना लक्ष घालण्याची मागणी

मुंबई : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची मुजोरी सुरू आहे. बेस्टच्या बस स्थानकांवरच टॅक्‍सीचालकांनी अनधिकृत थांबा तयार केला असून, प्रवाशांना मिळवण्यासाठी या टॅक्‍सीचालकांची झुंबड उडत आहे. प्रवाशांना रस्त्यावरच उतरवले जात असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत अधिकृत शेयर टॅक्‍सींची नोंदणी केली जाते; मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधिकृत टॅक्‍सी थांबा नसून प्रवाशांकडून दुप्पट भाडे वसूल केले जात आहे. शिवाय, हे टॅक्‍सीचालक प्रवाशांसोबत हुज्जत घालत असून, प्रवासी मिळवण्यासाठीही टॅक्‍सीचालकांमध्ये वाद होताना दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. शिवाय, पश्‍चिम रेल्वे मार्गावर लोकलमधून उतरणाऱ्या लाखो प्रवाशांचीही गर्दी असते. अशातच चर्चेगेट रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची प्रवासी मिळवण्याकरिता स्पर्धा दिसून येते. भररस्त्यात मधोमध टॅक्‍सी थांबवली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. शिवाय, भररस्त्यातच प्रवासी टॅक्‍सीतून उतरल्यानंतर जीव मुठीत धरून वाट काढताना दिसतात. ताडदेव प्रादेशिक परिवहन विभाग आणि आझाद मैदान वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन मुजोर टॅक्‍सीचालकांना लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.

कार्यालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्याने टॅक्‍सीच्या थांब्यासंदर्भातील माहिती देता येणार नाही. त्यातही याबाबत वाहतूक पोलिसांकडे माहिती उपलब्ध आहे. 
- रूपकुमार बेलसरे, 
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harrassed to passangers by taxi drivers near Churchgate station