हाथरस घटनेतील पीडिता मे महिन्यातच बोहल्यावर चढली असती, पण...! पीडितेच्या काकाने व्यक्त केली हळहळ

hathras
hathras

उल्हासनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा 8 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5 महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे मोठे काका रोशनलाल वाल्मिकी व चुलतभाऊ बलबीर वाल्मिकी यांनी दिली आहे. 

रोशनलाल हे गेल्या 35 वर्षांपासून उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात वास्तव्यास आहेत. हाथरस पथरी गावात वाल्मिकी परिवारातील केवळ चारच घरे आहेत. वाल्मिकी यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. पीडिता ही सर्वात लहान होती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला होता. मे मध्ये लग्न होणार होते; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने ती बोहल्यावर चढू शकली नाही आणि आता तिला पाशवी अत्याचारामुळे जीव गमवावा लागल्याची खंत रोशनलाल यांनी व्यक्त केली. योगी सरकारवर आपला विश्‍वास नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

यापुर्वीही अतिप्रसंग 
बलबीर वाल्मीकी यांनी सांगितले की, यापूर्वीही एकदा शेतात गाठून पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तिच्या आईला तिच्या प्रतिकाराचा आवाज येताच अतिप्रसंग करणाऱ्यांनी पळ काढला होता. मात्र 14 सप्टेंबर रोजी तिला शेतात गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. तिचे तोंड दाबून ठेवल्याने प्रतिकाराचा आवाज आला नाही.हे सांगताना बलबीर याचे डोळे पाणावले होते.

पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करा 
रोशनलाल यांची शिवसेना उपशहर प्रमुख संदीप गायकवाड यांनी आज भेट घेतली. गायकवाड म्हणाले, सुशांत सिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यापेक्षाही ही महाभयंकर घटना आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणो तिचा अत्यंविधी पेट्रोल टाकून घाई गडबडीत उरकणाऱ्या जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या विरोधात कायदेशीर करवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Hathras case She would have married in May but victim uncle expressed feelings

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com