वाशीतील पदपथांवर फेरीवाले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बेलापूर - वाशीतील सेक्‍टर नऊ, १०, ११ आणि १५ यांसारख्या नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या सेक्‍टरमधील पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. महापालिका कारवाई करत नसल्यामुळे त्यांचे फावले आहे, परंतु त्याचा त्रास पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

बेलापूर - वाशीतील सेक्‍टर नऊ, १०, ११ आणि १५ यांसारख्या नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या सेक्‍टरमधील पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. महापालिका कारवाई करत नसल्यामुळे त्यांचे फावले आहे, परंतु त्याचा त्रास पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

वाशी हे नवी मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल, मार्केट, सिनेमागृह, एपीएमसी, रुग्णालये, आयटी कंपन्या, शोरूम, कंपन्यांची कार्यालये आदींमुळे कामानिमित्त या परिसरात येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याचा फायदा पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांनी येथील पदपथ काबीज केले आहेत. सेक्‍टर ९, १०, ११ आणि सेक्‍टर १५ या ठिकाणचे पदपथ व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यापल्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयाशेजारच्या पदपथावरही वडापाव, इडली-सांबार, पादत्राणे व कपडे विक्री, ज्यूस सेंटर, हारवाले, पानटपऱ्या, पाणीपुरीच्या हातगाड्या थाटल्या आहेत. फेरीवाल्यांनी पदपथांवर थाटलेल्या दुकानांमुळे या परिसराला दररोज सायंकाळी जत्रेचे रूप येते. यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असून फेरीवाल्यांकडून पालिकेच्या पावसाळी गटारांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. विभाग कार्यालयाजवळच्या प्रकाराला वाशी विभाग अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी पदपथावर फेरीवाल्यांनी चक्क बांधकाम करून स्टॉल तयार केले आहेत. पालिका आयुक्तांचा वाशी भागात पाहणी दौरा असताना या फेरीवाल्यांना विभाग कार्यालयातून आधीच माहिती दिली जाते. त्यामुळे ते तेवढ्यापुरते गायब होतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी या ठिकाणच्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काही सामाजिक संघटनांनीही आयुक्तांकडे केली आहे.

वाशी विभागातील पदपथांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा फेरीवाले व्यवसाय करतात. त्याचा त्रास पादचाऱ्यांना होतो. याला विभाग अधिकारी जबाबदार आहेत. ते कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चौकशीची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
- बबन साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, वाशी

रस्ते, पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या वतीने सातत्याने कारवाई केली जात आहे. प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र असल्याने तक्रार करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
 - महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी

Web Title: Hawkers on the streets of Vashi