रेल्वेचा आरोग्यदायी फंडा : अवघ्या ६० रुपयांत १६ चाचण्या!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या स्थानकांत प्रवाशांसाठी आठ हेल्थ चेकअप एटीएम बसवण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रवाशांना ६० रुपयांत १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्या १० मिनिटांत करता येतील. तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे.

मुंबई : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या स्थानकांत प्रवाशांसाठी आठ हेल्थ चेकअप एटीएम बसवण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रवाशांना ६० रुपयांत १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्या १० मिनिटांत करता येतील. तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे.

हे वाचलंत का? : बेस्ट झालं... बसथांब्यांवर व्हर्टिकल गार्डन होणार

पश्‍चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर बसवलेले हेल्थ चेकअप एटीएम आठवडाभरात सुरू होण्याची शक्‍यता आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेमार्फत पहिल्या टप्प्यात आठ स्थानकांत आरोग्य तपासणी एटीएम सुरू केली जातील. त्यानंतर अन्य स्थानकांचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. हेल्थ एटीएममध्ये बॉडी मास इंडेक्‍स, हाडांची घनता, वजन, आंत्ररोग आदी १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्यांची व्यवस्था आहे. 

हेही वाचा : त्या तिन्ही आरोपी महिला डाॅक्टरांना `नायर`मधील बंदी कायम

प्रयोगशाळेतील सोईसुविधांनी सुसज्ज असणाऱ्या हेल्थ एटीएमसाठी एका वैद्यकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. या ठिकाणी रुग्णांना कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, फुप्फुस परीक्षा, स्त्रीरोगशास्त्र याबाबत सल्ला घेता येईल. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाचा एक भाग असलेल्या हेल्थ एटीएममार्फत आरोग्य चाचण्यांसाठी प्रवाशांकडून ६० रुपये आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून २० ते २५ रुपये शुल्क आकारण्यात येईल.

वाचायलाच हवं : घरच्या घरी `ब्लड शुगर` कंट्राेल करण्याचे सोपे पर्याय...

या चाचण्या होणार
अत्याधुनिक हेल्थ चेकअप एटीएमद्वारे बोन टेस्ट, बॉडी मास इंडेक्‍स, रक्तदाब, मेटाबॉलिक एज, फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, शरीराचे तापमान, ऑक्‍सिजनची मात्रा आणि वजन आदी कळणार आहे. प्रवाशांना चाचणीसाठी रक्त देण्याची गरज नाही. चाचणीनंतर १० मिनिटांत अहवाल दिला जाईल. प्रवाशांकडे तेवढाही वेळ नसेल, तर त्यांच्या ई-मेल आयडीवर अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या स्थानकांत सुविधा

  • मध्य रेल्वे : ठाणे, कल्याण अाणि लोकमान्य टिळक टर्मिनस
  • पश्‍चिम रेल्वे : अंधेरी, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर आणि बोरिवली

    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: Health Checkup ATM service will start at Railway Station, in mumbai