बेस्ट झालं... बस थांब्यांवर व्हर्टिकल गार्डन होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर अत्याधुनिक सोई-सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रशस्त पदपथ, बस थांब्यांवर व्हर्टिकल गार्डन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर अत्याधुनिक सोई-सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रशस्त पदपथ, बस थांब्यांवर व्हर्टिकल गार्डन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात राबवण्यात येणारा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरल्यास मुंबईतील इतर मार्गांवरही अशा सोई-सुविधा देण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

हे वाचलंत का? ः गणेश नाईकांना धक्का; `त्या` चार नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन!

माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर हा साडेचार किलोमीटरचा रस्ता मुंबईतील सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ आदी ठिकाणांमुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते, परंतु या महत्त्वाच्या रस्त्यावर आवश्‍यक सोई-सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवर सोई-सुविधा देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार कॅडल रोड म्हणजे वीर सावरकर मार्गावर हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे.​

धक्कादायक : मुंबईत अपघातांत वर्षभरात 179 जणांनी गमावला जीव

प्रकल्पांतर्गत शिवाजी पार्क-दादर परिसरात सौंदर्यीकरणासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या मार्गावरील पदपथाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. बस थांब्यांमागे झाडांच्या कुंड्यांचा वापर करून उभे उद्यान (व्हर्टिकल गार्डन) साकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक स्वच्छतागृह (इको टॉयलेट), ठराविक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शक्‍य असेल तिथे छोटा सुंदर बगिचा फुलवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुभाजक, वाहतूक बेटांवर छोटे बगिचे बनवण्यात येत आहेत. प्रकल्पात अपंग आणि दृष्टिहीन व्यक्तींसाठी पदपथांवर उतार आणि टॅकटाईल्स (घसरण प्रतिबंधक फरशा) बसवल्या जाणार आहेत.

हे वाचलंत का? : मुलांनो, पुस्तकं तुमची वाट पाहताहेत!

पालिका म्हणते, अपघात कमी होणार... 
शिवाजी पार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यापासून व्हर्टिकल गार्डन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या परिसरातील आणखी आठ बस थांब्यांवर उभी उद्याने निर्माण केली जातील. त्यामुळे परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. नागरिक पदपथांचा वापर करणार असल्यामुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पायलट प्रोजेक्‍ट जूनपर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best to decide to do a vertical garden at bus stops, in mumbai