बालदिनी कुपोषितांसाठी यंदा आरोग्य महाशिबिर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मोखाडा ः जव्हार येथील बालसंजीवन छावणीत १४ नोव्हेंबरला बाल दिनानिमित्त कुपोषित बालकांसाठी आरोग्य तपासणी महाशिबिर होणार आहे.

मोखाडा ः जव्हार येथील बालसंजीवन छावणीत १४ नोव्हेंबरला बाल दिनानिमित्त कुपोषित बालकांसाठी आरोग्य तपासणी महाशिबिर होणार आहे. कुपोषणाचा पालघर जिल्ह्यातून समूळ नायनाट व्हावा, यासाठी प्रभावी काम करणाऱ्या श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर जिल्हा परिषद आणि हिंदुजा हॉस्पिटलच्या सौजन्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या तपासणीमध्ये आढळणाऱ्या कुपोषित बालकांना आवश्‍यक ते उपचार आणि आहार देण्याचे काम बाल संजीवन छावणीच्या समन्वयाने होणार आहे, अशी माहिती विवेक पंडित यांनी दिली. सीआयडीफेम सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम हेदेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. जव्हार सेलवास रोड येथील बाल संजीवन छावणीत १४ नोव्हेंबरला सकाळी शिबिराचे उद्‌घाटन होणार आहे.

विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टने गेली तीन वर्षे जव्हार-मोखाड्यातील कुपोषणग्रस्त भागात कुपोषण आणि दारिद्य्र निर्मूलन अभियान सुरू केले आहे. गेल्या वर्षी विठू माऊली ट्रस्टने जव्हार येथे भव्यदिव्य असे बाल उपचार आणि आहार केंद्र बाल संजीवन छावणी या नावाने उभारले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छावणीचे उद्‌घाटन केले होते. या छावणीत १४ नोव्हेंबरला बाल दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी महाशिबिर होणार आहे. हिंदुजा हॉस्पिटल, जिल्हा परिषद यांचा यात सहभाग असेल. यात अनेक तज्ज्ञ डॉक्‍टर उपस्थित असणार आहेत.

उपचारांसह पोषक आहार देणार
बालकांना आवश्‍यक ते उपचार देण्यासाठी हिंदुजा हॉस्पिटलने तयारी दाखवली असून पोषक आहार देण्याची जबाबदारी बाल संजीवन छावणीची असेल. पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि त्या कुपोषणाची कारणे नष्ट करण्यासाठी श्रमजीवी आणि विठू माऊली ट्रस्ट विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने काम केले जात आहे. या शिबिरासाठी सिनेअभिनेता आणि सीआयडी या मालिकेत काम करणारे शिवाजी साटम हेदेखील प्रमुख अतिथी असतील. खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन आणि उद्योजक झुबेन गांधी हेदेखील निमंत्रित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Day this year for child malnutrition in Javhar