खारघरातील सिडको वसाहतीत आरोग्य सुविधाचे हस्तांतरण महापालिकेकडे 

गजानन चव्हाण 
मंगळवार, 19 जून 2018

खारघर, कळंबोली आणि पनवेल येथील सुरु असलेले आरोग्य केंद्र आणि कामोठे आणि कळंबोली येथे नव्याने उभारलेल्या इमारतीचा त्यात समावेश असणार आहे.

खारघर - खारघर, कळंबोली आणि पनवेल मधील सिडको वसाहतीत सिडकोने सुरु केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा 1 जुलै पासून पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी सकाळ दिली. 

सिडकोने खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे आदी भागात वसाहत निर्माण करताना आरोग्य सुविधाकडे दुर्लक्ष केले. नागरिकांना उपचारासाठी पनवेलच्या ग्रामीण रुग्णालय किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात गाठावे लागत असे, वसाहतीमधील नागरीकाच्या वाढत्या तक्रारीची दखल घेवून सिडकोने सात वर्षापूर्वी खारघर, कळंबोली आणि पनवेल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले. दोन वर्षापूर्वी पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्याने सिडकोने काही सुविधा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील आरोग्य ही सुविधा पनवेल महानगरपालिकेकडे 1 जुलै पासून हस्तांतर करण्यात येणार आहे. खारघर, कळंबोली आणि पनवेल येथील सुरु असलेले आरोग्य केंद्र आणि कामोठे आणि कळंबोली येथे नव्याने उभारलेल्या इमारतीचा त्यात समावेश असणार आहे. या आरोग्य केंद्रात सिडकोने नेमलेल्या 3 वैधकीय अधिकारी, 25 नर्स, 4 फार्मासिस्ट तर काही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि शिपाई असे एकून 56 कंत्राटी आरोग्य कर्मचारीचा समावेश आहे. पालिकेकडे हस्तांतर झाल्यावर औषधी खर्च आणि कर्मचारी वर्गाचे मानधन पालिका करणार आहे. 

सप्टेंबर महिन्यात पावसाळा संपल्यावर विविध ठिकाणी गटारात तुंबलेल्या पाण्यात डासअळी पैदास होऊन हिवताप तसेच डेंग्यूचे आजार बळावतात. त्यामुळे सिडकोच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर सर्व बाजूने दबाव येतो.पालिकेकडे हस्तांतर केल्या जात असल्यामुळे त्यातून सुटका होणार आहे.त्यामुळे सिडकोच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

1 जुलै पासून खारघर,कळंबोली आणि पनवेल येथे सुरु असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कळंबोली ,कामोठे येथे नव्याने उभारलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी उभारलेली इमारती पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. - बी एस बावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सिडको 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: the health facilities in the CIDCO colony has transferred to Municipal Corporation