
ठाणेकरांनो काळजी घ्या! स्वाईन फ्लूसह डेंगी, मलेरियाही फोफावतोय
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना ‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाण्यात डोके वर काढल्याचे चित्र आहे. ठाण्यात एकट्या जुलै महिन्यात २० स्वाईनचे रुग्ण आढळून आले असून यात आतापर्यंत दोन महिलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ठाण्यात एकट्या जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळून आले असून, यातील १५ जण उपचार घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे; तर ३ रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी २ रुग्ण हे ठाणे हेल्थ केअरमध्ये उपचार घेत असून, एक रुग्ण ज्युपिटर रुग्णालयात दाखल आहे.
स्वाईनने मृत झालेल्या दोनपैकी एक महिला ७१ वर्ष, तर दुसऱ्या महिलेचे वय ५१ आहे. यातील पहिली महिला शहरातील जितो रुग्णालयात १४ जुलैला उपचारासाठी दाखल झाली होती. १९ जुलैला त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला; तर दुसरी महिला १४ जुलैला ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, त्यांचा १८ जुलैला मृत्यू झाला. ठाण्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात औषध फवारणी व उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
डेंगी, मलेरियाही फोफावतोय...
ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूसोबतच डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले असून, डेंगीचे ८ तर मलेरियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. पालिका प्रशासनाने आतापर्यंत ६०० नागरिकांच्या घरात जाऊन ताप आणि स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणे आढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title: Health News Thane Alert Swine Flu Dengue Malaria Two Death Municipality Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..