esakal | या जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोळमडली ; गणेशोत्सवानंतर संकट होणार अधिक गडद 
sakal

बोलून बातमी शोधा

या जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोळमडली ; गणेशोत्सवानंतर संकट होणार अधिक गडद 

रायगड जिल्ह्यात 3 हजार 352 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अन्य आजाराचेही रुग्ण असल्याने जिल्ह्यातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे.

या जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोळमडली ; गणेशोत्सवानंतर संकट होणार अधिक गडद 

sakal_logo
By
संजय घारपुरे

अलिबाग  : कोरोनाला आटोक्‍यात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे; मात्र दररोज सरासरी 360 कोरोनाबाधितांची भर पडत असल्याने जिल्ह्यातील सरकारी रुग्णांलयातील 4 हजार 200 खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यातच अपुरे मनुष्यबळ आणि सामुग्रीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण आणखी वाढणार आहे. 

रायगड जिल्ह्यात 3 हजार 352 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अन्य आजाराचेही रुग्ण असल्याने जिल्ह्यातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्याचाच परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे इतर आजारांच्या उपचारावर आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थिरोगतज्ज्ञ, कान - नाक - घसा, बालरोग आणि हृदयविकारतज्ज्ञ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळेही आरोग्य यंत्रणा कोळमडल्याची स्थिती आहे. 

सावधान : तुम्ही वापरताय ते हातमोजे वापरलेले तर नाहीत ना?

 करोना साथ सुरू होत असताना, जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे 64 पदे भरली होती. याचबरोबर परिचारिका, स्वच्छता कर्मचारी भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत ही पदे भरण्यास सुरुवात झाली; परंतु कोरोना रुग्णांवर उपचार करताना, अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही या आजाराने ग्रासल्याने काही नवनियुक्त डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्याने आरोग्य विभागाचा ताप वाढला आहे. 

हे वाचा : ...तर सीबीआय अधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागेल

सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या 4 हजार 985 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अन्य रुग्णही मोठ्या संख्येने असल्याने रुग्णांलयातील खाटांची संख्या कमी पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह असतानाही लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे गौरी-गणपतीत नागरिकांचा परस्पराबरोबर संपर्क वाढणार असल्याने कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान, कोरोना काळात कुटुंब नियोजन, पोषण आहार, एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रम यासारख्या विषयांकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष झालेले असल्याने भविष्यात त्याचेही परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा रुग्णालयाची वाताहात 
रायगड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे; परंतु सांडपाण्याचा निचरा, गरम पाण्याची सुविधा, अस्वच्छ परिसर, उंदीर- घुशींचा वावर, डासांचे वाढते प्रमाण अशा अनेक समस्यांना येथे येणाऱ्या रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये स्लॅब कोसळल्याने पावसात पाणी गळण्याचे 
प्रमाण वाढले आहे. 
 
ओपीडीला अल्प प्रतिसाद 
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर तालुक्‍यांतील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी प्रमाणात आहे. कोरोनामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही कर्मचारी जोखीम न स्वीकारता खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत आहेत. प्रत्येक रुग्णांना कोरोनाबाधित रुग्ण म्हणून पाहिले जात असल्याने आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

पोषण आहार योजनेकडे दुर्लक्ष 
कर्जत, खालापूर तालुक्‍यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधित आहे. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. यामुळे गर्भवती, स्तनदा माता, सौम्य कुपोषित बालके यांच्यासाठी सुरू असलेल्या पोषण आहार योजनेकडे दुर्लक्ष होत आसल्याचे दिसून येत आहे. 
 
खासगी डॉक्‍टरांकडून लुट 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास खासगी रुग्णालयांना परवानगी देत दरपत्रक ठरवण्यात आले आहेत; मात्र याकडे दुर्लक्ष करत खासगी रुग्णालयांकडून जादा रकमेची मागणी केली जात आहे, अशा तक्रारी आहेत. त्याचबरोबर इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. 

रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील खाटांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. नव्या निकषाप्रमाणे, लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. 
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय 

राज्यात अनेक ठिकाणी इतर विकासकामे बाजूला ठेवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न करण्यात आले आहेत; परंतु रायगड जिल्ह्यात हे प्रयत्न दिसून येत नाहीत. आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. गोरगरीब रुग्णांना कोरोनाबाबत उपचार करणे परवडण्यासारखे नाही. 
- अजित पाटील, सदस्य, रुग्ण कल्याण समिती 

loading image
go to top