हृदयासाठी विरघळणारे स्टेण्ट

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

हृदयविकाराच्या झटक्‍यानंतर धमन्यांमध्ये धातूचे स्टेण्ट बसवून रक्त वाहिन्यांमधील अडथळे दूर केले जातात. हे स्टेण्ट आयुष्यभर मानवाच्या शरीरात राहतात. मात्र आता भारतात प्लॅस्टिकच्या एका घटकापासून बनवलेले स्टेण्ट तयार करण्यात आले असून, हे स्टेण्ट अडीज वर्षांत विरघळतात.

मुंबई - हृदयविकाराच्या झटक्‍यानंतर धमन्यांमध्ये धातूचे स्टेण्ट बसवून रक्त वाहिन्यांमधील अडथळे दूर केले जातात. हे स्टेण्ट आयुष्यभर मानवाच्या शरीरात राहतात. मात्र आता भारतात प्लॅस्टिकच्या एका घटकापासून बनवलेले स्टेण्ट तयार करण्यात आले असून, हे स्टेण्ट अडीज वर्षांत विरघळतात.

‘मेरीलाइफ सायन्सेस’ या कंपनीने हे स्टेण्ट बनवले आहेत. भारतातील १०८ रुग्णांमध्ये हे स्टेण्ट गेल्या दोन, तीन वर्षांपासून ॲजिओलप्लास्टी शस्त्रक्रिया करून बसविण्यात आले आहेत. त्यातील काही रुग्ण मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील आहेत. रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये बसविण्यात आलेल्या स्टेण्टचा अभ्यास दिल्लीच्या फोर्टिस एक्‍सोर्प रुग्णालयाचे डॉ. अशोक शेठ, लोकमान्य टिळक रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजय महाजन, तसेच डॉ. परवीन चंदा यांनीही या स्टेण्टचा अभ्यास केला आहे. हे स्टेण्ट वापरण्यास हरकत नसून त्यापासून शरीराला काही धोका नसल्याचे डॉ. अशोक शेठ यांनी त्यांच्या एका अहवालात नमूद केले आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिऑलॉजी या जगविख्यात संस्थेच्या परिषदेत या स्टेण्टबाबत माहिती देण्यात आली. त्यात डॉ. शेठ यांचा अहवाल नमूद केला आहे.

लाइफ सायन्सचे उपाध्यक्ष संजीव भट यांच्यासह  डॉ. पी. के. मनोचा, डॉ. अशोक ठक्कर हे या विरघळणाऱ्या स्टेण्टटच्या निर्मितीसाठी गेल्या पाच वर्षांपासून संशोधन करत होते. या स्टेंटसाठी प्लॅस्टिकमधील ‘पोलिमा’ या घटकाचा वापर करण्यात आला आहे. हा घटक पाण्यातही सहज मिळसतो. अडीज वर्षांनंतर हे स्टेण्ट शरीरात आपोआप विरघळणार असून, त्याचा आरोग्यास कोणताही धोका राहाणार नाही असे भट यांनी सांगितले.

किमतीचा वाद 
केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्टेण्टची किंमत मर्यादित ठेवावी लागते. सध्या धातूच्या स्टेण्टची किंमत जास्तीत जास्त ४० हजार रुपये आहे. तर या स्टेण्टची किंमत ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे किमतीची मर्यादा वाढवून देण्याची मागणी या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे.

सप्टेंबरपासून उपलब्ध होणार 
या स्टेण्टचे ‘मेरिस १००’ असे नामकरण केले आहे. हे विशेष संशोधन आहे. केंद्राच्या द ड्रग प्राइज कंट्रोल ऑर्डर या संस्थेच्या बत्तिसाव्या परिच्छेदात विशेष उत्पादनासाठी विशेष किंमत लागू करण्याची तरतूद आहे. परदेशात ‘मेरिस १००’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारतातही ‘मेरिस १००’ आवश्‍यक परवानग्या पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर अखेरीस उपलब्ध होईल, असे संजीव भट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart Attack Staint HealthCare Sickness