उष्माघातावर झेडपीचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

ठाणे - सध्या प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेल्याने उष्माघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) आरोग्य विभागाने १० ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी एक बेड आरक्षित ठेवला आहे. उन्हापासून बचाव करण्याची काळजी घेण्यासह उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत तब्बल पाच हजार जनजागृतीपर पत्रके वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे - सध्या प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेल्याने उष्माघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) आरोग्य विभागाने १० ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी एक बेड आरक्षित ठेवला आहे. उन्हापासून बचाव करण्याची काळजी घेण्यासह उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत तब्बल पाच हजार जनजागृतीपर पत्रके वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा मार्च महिन्यातच मे महिन्याची अनुभूती येत असल्याने आरोग्य विभागाद्वारे उन्हापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन जिल्हावासीयांना तसे आवाहन केले आहे. तापमानाने चाळिशी ओलांडल्यानंतर आरोग्यविषयक अनेक तक्रारी डोके वर काढत असून, लहान मुले व वृद्धांना दाहकतेचा प्रकर्षाने त्रास होत आहे. यापासून बचाव व्हावा, उष्माघाताने कोणतीही जीवितहानी होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

उष्माघात टाळण्यासाठी पत्रके, फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास आपत्कालीन आरोग्य सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा. तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यात हे टाळा
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. दुपारच्या काळात बाहेर पडणे टाळा. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकाच्या वेळी घराची दारे व खिडक्‍या बंद ठेवू नका. 

अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करा.
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्या.
उन्हात काम करताना डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, आहारात ताक-लस्सी, लिंबूपाणी यांचा नियमित वापर करा.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. 
चक्कर येत असल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 
गुरांना छावणीत ठेवावे; तसेच त्यांना पुरेसे पाणी द्या.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनसेडचा वापर करा.
रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्या. पंखे, ओले कपडे यांचा वापर करा.
थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करा.
कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी शेतमजूर व कामगारांना सूचित करा.
पहाटेच्या वेळेत जास्तीत-जास्त कामे करा.
बाहेर काम करत असताना मध्ये विश्रांती घ्या.
गर्भवती महिला व आजारी व्यक्तींची अधिक दक्षता घ्या.

यंदा तापमान वाढल्यामुळे उष्माघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आतापर्यंत उष्माघाताचा एकही रुग्ण दाखल झालेला नाही, तरीही उष्माघात टाळण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील १० उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक बेड आरक्षित ठेवला असून, पाच तालुक्‍यांतील ३३ आरोग्य केंद्रं आणि १८५ उपकेंद्रांमधून उष्माघातापासून बचाव करण्याबाबत पाच हजार जनजागृतीपर पत्रके वितरित करणार आहोत.
- डॉ. बी. एस. सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Heatstroke thane