मुंबईसह, ठाणे, पालघरमध्ये आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

समीर सुर्वे
Monday, 21 September 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज असून मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील काही भागात सोमवार मंगळवारी वादळी वाऱ्यांसह 204 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता असून जिल्ह्यात दोन दिवसांसाठी अंबर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात आज अंबर अलर्ट असून मंगळवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने दुसऱ्यांदा केलं मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणातील पावसाचा जोर वाढणार असला तरी काल मुंबईत उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. कुलाबा येथे काल संध्याकाळपर्यंत कमाल 31 अंश आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सांताक्रुझ येथे कमाल 32.2 आणि 25 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारपर्यंत काही प्रमाणात तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

या काळात समुद्रातही वादळी वारे वाहणार आहेत.  किनाऱ्यावर तसेच खोल समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहातील. त्यामुळे मासेमारीसाठी सुमद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

महत्त्वाची बातमी :  देवेन भारतींना अद्याप नेमणूक नाही, अठरा पोलिस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

अंबर अलर्ट - नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाने सज्ज राहावे.

रेड अलर्ट - सर्व यंत्रणांनी आपत्ती निवारणाची प्राथमिक तयारी करुन ठेवावी. 

( संपादन - सुमित बागुल )

heavy rain expected in mumbai thane and palghar with stormy winds


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain expected in mumbai thane and palghar with stormy winds