मुसळधार पावसाचा एसटीला फटका 

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

दोन दिवसांत २०४ फेऱ्या रद्द; सव्वापाच लाखांचे नुकसान

मुंबई : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारालाही बसला. या दोन दिवसांत एसटीच्या तब्बल २०४ फेऱ्या रद्द झाल्याने ५ लाख १६ हजार रुपयांच्या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले. 

पनवेल एसटी आगारातून राज्यभरात बस जातात. त्यामुळे आगारात नेहमी प्रवाशांची मोठी गर्दी असते. दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते; तर अनेक गावांचा संपर्क तुटल्याने एसटीने प्रवास करणारे प्रवासीसुद्धा कमी प्रमाणात घराबाहेर पडले. पावसाच्या पाण्यासोबतच कमी प्रवासी संख्येमुळेही काही भागातील फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. अनेक भागात रात्री पाठवण्यात आलेल्या बस त्या ठिकाणीच अडकून पडल्याने कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या मुक्कामाला राहावे लागल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २६ जुलै रोजी ७१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून ३,०३३ किलोमीटरचा प्रवास कमी झाला. तसेच शनिवारी सर्वाधिक ६,२०५ किलोमीटरवरील १३१ फेऱ्या रद्द केल्या गेल्या. या दोन्ही दिवसांच्या कमी झालेल्या किलोमीटर अंतराचा सरासरी विचार केल्यास पनवेल आगाराचे  दोन दिवसांतील उत्पन्न जवळपास ५ लाख १६ हजार रुपयांनी कमी झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एसटी आगारातील कार्यालयाला गळती
पनवेल एसटी आगाराचा कायापालट करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना गळक्‍या छताखाली आपले कामकाज करावे लागत आहेत. छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खराब होण्याची शक्‍यता लक्षात घेत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याचे पनवेल कार्यालयात पाहायला मिळाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain hit ST