धुवाधारमुळे माथेरानची दाणादाण

अजय कदम
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

माथेरान : गेल्या शनिवार रात्रीपासून रविवारपर्यंत माथेरानमध्ये धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे या गावाची दाणादाण उडाली. रविवारच्या 24 तासात या तब्बल 440 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एका दिवसात देशातील सर्वाधिक पावसाची ही नोंद असल्याचा दावा "स्कायमेट'ने केला आहे. 

माथेरान : गेल्या शनिवार रात्रीपासून रविवारपर्यंत माथेरानमध्ये धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे या गावाची दाणादाण उडाली. रविवारच्या 24 तासात या तब्बल 440 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एका दिवसात देशातील सर्वाधिक पावसाची ही नोंद असल्याचा दावा "स्कायमेट'ने केला आहे. 

अतिवृष्टीमुळे माथेरानच्या सखल भागांना तळ्याचे रूप आले होते. रौद्र रूपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन दिवस पाणीपुरवठाही ठप्प होता. मोबाईल नेटवर्क नसल्याने माथेरानकरांचा संपर्क तुटला होता. 
पावसाचा जोर अधिक आणि गटारे अरुंद अशा स्थितीमुळे गटारातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे रस्त्यावरून आलेल्या पाण्याचा प्रवाह काही व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरला. काही घरांमध्येही पाणी शिरले होते. हे गाव उतारावर असल्याने पाण्याचा निचरा लवकर होतो. परंतु अतिवृष्टीने रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून चालावे लागत होते. या वर्षी 5 ऑगस्टपर्यंत 4 हजार 676 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

रस्त्यांची चाळण 
माथेरानच्या 54 किलोमीटर क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याने रस्त्याची दगड-माती वाहून गेली. त्यामुळे येथील रस्त्यांना चर पडून रस्त्यांची पूर्ण चाळण झाली आहे. 
 
शटल सेवेला फटका 
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. त्या स्थितीत शनिवारी सकाळी अमन लॉज - माथेरान शटल सेवा सुरू होती. पण पावसाचे पाणी रेल्वे रुळातून नदीप्रमाणे वाहत होते. त्यामुळे रेल्वे रुळातील खडी वाहून गेली. परिणामी ही सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Matheran